सातारा प्रतिनिधी
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मोठा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातून कांदा खरेदीबाबत मोठी घोषणा करत सरकार थेट बाजारात उतरून कांदा खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साताऱ्यात आयोजित प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
कांद्याला मिळणार हमीभावासारखा आधार
राज्यात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असताना बाजारभाव मात्र कोसळले आहेत. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात मिळणारे दर अत्यंत कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. अनेक ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर कांदा फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कांदा खरेदीसाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले. त्यानंतर आता सरकारकडून १२ रुपये ३५ पैसे प्रति किलो दराने कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा आधार मिळणार असून बाजारातील घसरणीचा काही प्रमाणात फटका कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऊस उत्पादकांनाही दिलासा देण्याचे आश्वासन
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे ऊस कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादकांना न्याय मिळावा आणि कारखानदारी मजबूत व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा शब्द त्यांनी दिला.
प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान
शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास त्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. बँकांचे कर्ज नियमित भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देऊन त्यांचा सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सकारात्मक संदेश मिळणार आहे.
‘लखपती दीदी’ अभियानावर भर
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायचे असेल, तर महिलांना आर्थिक मुख्य प्रवाहात आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात राज्याच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व महिलाच करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक संकटाचा उल्लेख, मोदींच्या आवाहनाचा पुनरुच्चार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात जागतिक परिस्थितीचाही उल्लेख केला. जगभरात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली असताना भारतात अत्यल्प वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांकडून केलेल्या अपेक्षा पूर्ण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
सरकारच्या कांदा खरेदी निर्णयामुळे सध्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया किती प्रभावीपणे राबवली जाते याकडे आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


