रणजित मस्के,प्रतिनिधी
सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि सीईआयआर पोर्टलच्या मदतीने हरवलेले तब्बल १६ लाख रुपये किमतीचे ८० स्मार्ट मोबाईल शोधून काढत नागरिकांना दिलासा दिला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सातारा शहर परिसरातून गहाळ झालेले हे मोबाईल महाराष्ट्रासह इतर राज्यांतून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
सातारा शहर हे जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र असल्याने दररोज हजारो नागरिक शहरात ये-जा करतात. प्रवासादरम्यान, बसस्थानक, बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क साधून चिकाटीने शोधमोहीम सुरू ठेवली. अखेर हरवलेले मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या उपस्थितीत मंगळवारी संबंधित नागरिकांना मोबाईल परत करण्यात आले. या कारवाईमुळे नागरिकांकडून सातारा शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रशांत मोरे, रणजित कुंभार, ओमकार डुबल, यशवंत घाडगे, राकेश घाडगे आणि रामदास भास्करवाड यांनी ही कारवाई केली.


