मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या उपनगरीय लोकलमधील प्रचंड गर्दीत दररोज प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत पश्चिम रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सुलभ प्रवासाचा विचार करून लोकलमधील काही लगेज डब्यांचे रूपांतर विशेष ज्येष्ठ नागरिक कोचमध्ये करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेनंतर रेल्वे प्रशासनाने ही योजना प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण उपनगरीय मार्गावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने डिझाइन करण्यात आलेल्या या विशेष कोचमध्ये २७ ज्येष्ठ नागरिकांना आरामात बसता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्दीच्या वेळेत चढ-उतार करताना होणारी अडचण लक्षात घेऊन डब्याच्या आतील रचनेत बदल करण्यात आले आहेत. दरवाजांजवळ अतिरिक्त सपोर्ट पोल, मजबूत हँडग्रिप्स, तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडतील अशा विशेष सुरक्षा सुविधाही बसवण्यात आल्या आहेत.
मुंबईतील लोकल प्रवास हा लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रवास अनेकदा धोकादायक आणि त्रासदायक ठरत होता. आरक्षित आसने असली तरी ती गाठणेच कठीण होते. अनेकदा गर्दीत ढकलाढकली, चढताना-उतरताना तोल जाणे किंवा उभे राहून प्रवास करण्याची वेळ ज्येष्ठांवर येत होती. याच पार्श्वभूमीवर स्वतंत्र आणि सुरक्षित जागेची मागणी सातत्याने होत होती.
पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, यासाठी विद्यमान लगेज कोचचाच पुनर्वापर करण्यात येत आहे. त्यामुळे इतर प्रवाशांच्या प्रवासी क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जनरल लगेज डबा पूर्णपणे हटवण्यात येणार नसून, त्यात आवश्यक ते बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येत आहे.
हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ मध्ये सुमारे ४.६२ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून सुरू करण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सध्या दररोज १०५ लोकल सेवा चालतात. त्यापैकी ४० लोकलमध्ये आधीच या प्रकारचे सुधारित कोच उपलब्ध करण्यात आले असून, उर्वरित ६५ लोकलमध्ये मार्च २०२७ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. वाढती गर्दी, वेगवान जीवनशैली आणि सुरक्षिततेचे प्रश्न लक्षात घेता पश्चिम रेल्वेचा हा निर्णय ज्येष्ठांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. नव्या डेडिकेटेड कोचमुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सन्मानपूर्वक प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


