अहिल्यानगर प्रतिनिधी
समाजातील जड-तड रुढी, अंधश्रद्धा आणि मृत्यूनंतरच्या विधींवर होणाऱ्या अवाजवी खर्चाच्या विरोधात नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी एक वेगळाच आणि धाडसी प्रयोग राबवला आहे. जिवंतपणीच स्वतःचा दशक्रिया विधी पार पाडत त्यांनी पारंपरिक समजुतींना थेट आव्हान दिले असून, या कृतीमुळे सामाजिक चर्चेला नव्याने ऊत आला आहे.
आरगडे यांनी स्मशानभूमीत स्वतःच्या हस्ते पिंडदान करून दशक्रिया विधी आयोजित केला. या वेळी त्यांच्या पत्नी प्रियंका आरगडे आणि मुलगा संग्राम यांनी सत्यशोधक पद्धतीने विधी पार पाडले. विशेष म्हणजे, काही वेळातच कावळ्याने पिंडाला स्पर्श केल्याने प्रचलित समजुतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
“कावळा पिंडाला शिवतो, याचा अर्थ मृत आत्म्याला शांती मिळाली, असा समज आहे. मात्र कावळ्याला माणूस जिवंत आहे की मृत, याची जाणीव नसते. तो केवळ अन्नासाठी पिंडाला स्पर्श करतो,” असे स्पष्ट करत आरगडे यांनी ‘कावळा शिवणे’ या प्रथेमागील अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्यांच्या मते, अशा समजुतींमुळे लोक अनाठायी भीती आणि दबावाखाली वागत असतात.
या कृतीपुरतेच मर्यादित न राहता आरगडे यांनी विधवा प्रथेलाही ठाम विरोध दर्शविला आहे. त्यांनी तयार केलेल्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रात आपल्या निधनानंतर पत्नीने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र काढू नये, अशी स्पष्ट नोंद केली आहे. “स्त्रीने सन्मानाने आयुष्य जगावे, समाजाने तिच्यावर कोणत्याही जुनाट प्रथा लादू नयेत,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
ग्रामीण भागात दशक्रिया आणि तेराव्या विधींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. अनेक कुटुंबांना यासाठी कर्जबाजारी व्हावे लागते. या पार्श्वभूमीवर “माणूस जिवंत असताना त्याच्या गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे; मृत्यूनंतरच्या विधींवर अनाठायी खर्च करण्यापेक्षा तो पैसा समाजोपयोगी कार्यासाठी वापरावा,” असे आवाहनही आरगडे यांनी केले.
यापूर्वीही ग्रामपंचायतीत ‘जातमुक्त गाव’ संकल्पना राबवून आरगडे यांनी पुरोगामी भूमिका घेतली होती. त्यांच्या या नव्या कृतीने सामाजिक सुधारणांच्या चर्चेला अधिक चालना मिळाली आहे. सोशल मीडियावर आणि विविध स्तरांतील विचारवंतांकडून त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत असून, अंधश्रद्धाविरोधी चळवळीला यामुळे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


