अहिल्यानगर प्रतिनिधी
जामखेडमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या नर्तिका दिपाली पाटील आत्महत्येच्या प्रकरणाने जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढले आहे. खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन दिपालीने संपवलेल्या आयुष्यामागे सातत्याने लग्नासाठी दबाव आणणाऱ्या संदीप गायकवाडचे नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. दिपालीच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीत या दबावामुळेच मुलीला हा निर्णय घ्यावा लागल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गरीब कुटुंबातील दिपाली, विवाहित, दोन मुलांची आई
दिपाली पाटील ही मूळची कल्याण येथील. विवाहानंतर काही महिन्यांनी पतीशी मतभेद झाल्याने ती विभक्त राहू लागली. तिची दोन लहान मुलं आजीकडे राहतात. आर्थिक विवंचनेतून जामखेड येथील घुंगरू कला केंद्रात तिने नृत्यांगना म्हणून काम सुरू केले. कला केंद्राचे प्रमुख अरविंद जाधव यांच्या मते, “दिपाली अतिशय गरीब परिस्थितीत आमच्याकडे आली होती. मात्र तिने तीन महिन्यांपूर्वीच कला केंद्र सोडले होते.”
लॉजमध्ये मृतदेह; सीसीटीव्हीतून महत्त्वाचा पुरावा
दोन दिवसांपूर्वी ती ‘बाजारात जाऊन येते’ असे सांगून घराबाहेर पडली. परत न आल्याने मैत्रिणींनी शोध घेतला. रिक्षाचालकाने तिला साई लॉजमध्ये सोडल्यानंतरच तिचा मागोवा थांबलेला दिसला. लॉजमध्ये रूम आतून लॉक होती. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यावर पंख्याला गळफास घेतलेली दिपाली आढळली. याच वेळेस संदीप गायकवाडही लॉजमध्ये गेल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
राजकीय उष्णता वाढली
या प्रकरणाचा राजकीय आयाम अधिक तीव्र ठरला आहे. संदीप गायकवाड हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्याची पत्नी लता गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी लढवली होती. दरम्यान संदीप यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची माहितीही पुढे आल्याने दोन्ही पक्षांत आरोप–प्रत्यारोप रंगले आहेत.
रोहित पवार यांनी भाजपची उमेदवार निवड गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन देणारी असल्याचे निवडणुकीदरम्यान म्हटले होते. त्यानंतर आता हाच मुद्दा पुन्हा उजेडात येत असून पवार यांनी सोशल मीडियावरून या घटनेची “सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा” करण्याची मागणी केली आहे.
“महिला सुरक्षेला धोका” ‘राज्यभरातून प्रतिक्रिया
दिपाली पाटील आत्महत्येनंतर राज्यातील अनेक नेत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याची टीका करत, घटनेमागील सर्व बाजूंची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. स्थानिक पातळीवरही जनभावना तीव्र आहेत.
सध्याची परिस्थिती
संदीप गायकवाडला अटक झाली असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे. लॉजमधील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि दिपालीच्या मैत्रिणींची सविस्तर माहिती तपासात महत्त्वाची ठरत आहे. दिपालीच्या मृत्यूप्रकरणी दबाव, वैयक्तिक आयुष्य, राजकीय संबंध आणि कला केंद्रातील तिच्या काळाबाबत विविध पैलूंवर तपास यंत्रणा काम करत आहे.


