अहिल्यानगर प्रतिनिधी
फ्लॅट खरेदीसाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्याच्या सततच्या तगाद्याला व मानसिक छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहित महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
डॉ. गौरी अमित दळवी-चौरे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील सुनील जबाजी चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अमित बाबासाहेब दळवी, सासू संगीता दळवी आणि सासरे बाबासाहेब दळवी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरीचे लग्न २३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाले होते. विवाहानंतर ती मुंबईत पतीसोबत राहत होती. याच काळात पतीकडून फ्लॅट खरेदीसाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत होती. “साधे लग्न करून भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण,” अशा शब्दांत तिचा मानसिक छळ करण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
गौरी ही खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिचा पगार पतीकडून काढून घेतला जात असल्याचा आरोप आहे. तसेच लग्नातील दागिनेही सासरच्यांनी बळकावल्याची माहिती तिने आई-वडिलांना दिली होती. पतीला दारूचे व्यसन असून पैशांसाठी तो मारहाण करत असल्याचेही तिने सांगितले होते. त्याचबरोबर त्याचे इतर महिलांशी संबंध असल्याचा संशयही गौरीने फेब्रुवारी २०२६मध्ये व्यक्त केला होता.
घटनेच्या पार्श्वभूमीवर, गौरीची आई मुंबईत जाऊन कुटुंबातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करून आली होती. मात्र, त्यानंतरही छळ थांबला नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, २७ एप्रिल रोजी गौरी, तिचा पती आणि सासरे गोरेगाव येथे आले होते. त्यावेळी पतीने “मी वडिलांना नगरला सोडून तुला घेण्यासाठी परत येतो,” असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो परतलाच नाही. त्यानंतर त्याचा संपर्कही तुटल्याचे सांगितले जाते.
२८ एप्रिल रोजी गौरी आणि तिची आई अहिल्यानगर व मुंबई येथे गेल्या असता संबंधित घरांना कुलूप असल्याचे दिसून आले. यामुळे गौरी अधिकच मानसिक तणावाखाली गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
शनिवारी सकाळी गोरेगाव येथील घरात एकटी असताना गौरीने गळफास घेतला. आई शेतातून परत आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. तिला तातडीने पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हुंडाबळी व कौटुंबिक अत्याचाराच्या संशयावरून तपासाची दिशा निश्चित करण्यात येत असून, संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुण महिलेने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक छळ व हुंडा प्रथेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


