नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त शिल्पा देशपांडे या अचानक बेशुद्ध पडल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजादरम्यान हा प्रकार घडला. देशपांडे या नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्या तळमजल्यावरील महिला स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच तेथील महिला सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने देशपांडे यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय उपचारांसाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, त्यांना नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या कामाच्या ताणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशपांडे यांची प्रकृती स्थिर असून पुढील निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
या घटनेनंतर महापालिकेतील कामकाजाचा ताण आणि अधिकाऱ्यांवरील वाढती जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.


