नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी विविध दुरुस्ती व पाइपलाइन जोडणी कामांमुळे शहरातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सी.बी.डी. सेक्टर-२८ पंप हाऊस येथे मॅनिफोल्ड व व्हॉल्व बसविणे तसेच कळंबोली सर्कल आणि नेरुळ सेक्टर-१९ वंडरपार्क येथील जलवाहिन्यांवर व्हॉल्व बसविण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. यासोबतच घणसोली सेक्टर-२ येथे १०० मिमी व्यासाच्या पाइपलाइन जोडणीचे कामही करण्यात येणार आहे.
या कामांमुळे बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
याचा परिणाम बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या भागांवर होणार असून, संबंधित नोड्स तसेच सिडको क्षेत्रातील काही भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहील. विशेषतः बुधवार संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, तर गुरुवार, दि. २३ एप्रिल रोजी सकाळी व संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या कालावधीत पाण्याचा जपून व आवश्यक तेवढाच वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे.


