ठाणे प्रतिनिधी
नवी मुंबई : रविवारी बँकेच्या कामकाजासाठी बाहेर पडलेल्या युनियन बँकेच्या महिला अधिकाऱ्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. नेरूळ येथील पामबीच रोडवरील सारसोळे सिग्नलजवळ हा अपघात झाला. नेहा राजीवकुमार गुप्ता (३६) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी टॅक्सीचालक मोवीन आसिफ शेख (३५) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास नेहा गुप्ता रिक्षातून प्रवास करीत होत्या. सारसोळे सिग्नलजवळ त्यांच्या रिक्षाला टॅक्सीने धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोवीन शेख हा टॅक्सी चालवत होता. त्याने वाहन हयगयीने, अविचाराने आणि भरधाव वेगाने चालवून रिक्षाला धडक दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांच्या २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होऊ नये, यासाठी २७ सप्टेंबरला रविवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते.
रविवारी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नेहा गुप्ता यांनी कौटुंबिक अडचणी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना कळविले होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. घरी मुलाची देखभाल करण्यासाठी कोणी उपलब्ध नसल्याने कार्यालयात येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा सहकाऱ्यांनी केला. त्यानंतर त्या रविवारी कामासाठी कार्यालयात आल्या होत्या.
दरम्यान, रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सोमवारपासून सुरू होणारा तीन दिवसांचा प्रस्तावित संप स्थगित करण्यात आला.
रविवारी बँकिंग क्षेत्रातील कामकाज सुरू असतानाच झालेल्या या अपघातात नेहा गुप्ता यांचा मृत्यू झाल्याने बँक कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरलेला हा दिवस त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपला.


