सातारा प्रतिनिधी
सातारा पंचायत समितीच्या सत्तासमीकरणात अखेर भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. कोंडवे गणातील भाजपचे महेश गाडे यांची पंचायत समितीच्या सभापतीपदी तर अतीत गणातील सुषमा जाधव यांची उपसभापतीपदी निवड झाली. त्यामुळे पंचायत समितीतील सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात राहिली आहेत.
पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या उमेदवारांना बहुमत मिळाले. हात उंचावून झालेल्या मतदानात महेश गाडे आणि सुषमा जाधव यांना दहा मते मिळाली, तर विरोधी गटातील राष्ट्रवादीचे सभापतीपदाचे उमेदवार राहुल कापले आणि उपसभापतीपदाच्या उमेदवार स्वप्नाली फडतरे यांना सहा मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. तहसीलदार समीर यादव आणि गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या उपस्थितीत सकाळी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. अर्जांची छाननी झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.
सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती. मात्र विरोधकांनी अखेर उमेदवार उभे करून थेट लढत दिल्याने पंचायत समितीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तरीही मतांचे गणित भाजपच्या बाजूने असल्याने अखेर सभापती आणि उपसभापतीपदावर भाजपने शिक्कामोर्तब केले.
निवडीची घोषणा होताच पंचायत समिती परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि मिरवणूक काढत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः उपस्थित राहून नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, पाटखळ गणातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले राहुल शिंदे यांचे नावही सभापतीपदासाठी चर्चेत होते. मात्र पाटखळ गण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येत असल्याने भविष्यातील राजकीय गणित लक्षात घेऊन त्यांना संधी देण्यात आली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याचवेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोज घोरपडे यांच्या गटातील काशीळ गावच्या सुषमा जाधव यांना उपसभापतिपदी संधी देत स्थानिक राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेचा विचार करून अतीत गणातील उमेदवाराला संधी देण्यात आल्याचीही चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.
शिवसेनेचे मत राष्ट्रवादीच्या पारड्यात
या निवडणुकीत शिवसेनेच्या नागठाणे गणातून विजयी झालेले सदस्य संतोष साळुंखे यांचे मत कुणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मतदानाच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. हा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वीस वर्षांनंतर काशीळ गावाला पुन्हा मान
दरम्यान, अतीत गणातून सुषमा जाधव यांच्या निवडीमुळे काशीळ गावाला तब्बल वीस वर्षांनंतर पंचायत समितीच्या पदाचा मान मिळाला आहे. यापूर्वी २००२ ते २००७ या कालावधीत अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शिवाजी जाधव या अतीत गणातून निवडून येत सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या. त्या घटनेची पुनरावृत्ती आता दोन दशकांनंतर झाल्याने काशीळ परिसरात समाधानाचे वातावरण आहे.


