सातारा प्रतिनिधी
कोरेगाव : तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असताना काही व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन करून घरगुती सिलिंडरचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुका पुरवठा विभागाने सातारा रोड परिसरात धडक कारवाई करत राजपुरोहित स्वीट मार्ट येथून घरगुती वापराचा गॅस सिलिंडर जप्त केला.
पुरवठा निरीक्षक गौरव माने यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा रोडचे मंडल अधिकारी अशोक तारळकर, लिपिक प्रशांत कदम आणि ग्राम महसूल अधिकारी महेश देवकर यांच्या पथकाने हॉटेल, स्वीट मार्ट तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान राजपुरोहित स्वीट मार्ट येथे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित सिलिंडर जप्त करण्यात आला.
नियमांनुसार व्यावसायिक आस्थापनांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर केल्यास सर्वसामान्य ग्राहकांवर परिणाम होऊन टंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या कारवाईमुळे सातारा रोड परिसरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील, असा इशाराही पुरवठा विभागाने दिला आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या पावलांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.


