बारामती प्रतिनिधी
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, राजकीय वर्तुळात ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानापर्यंत जाईल की बिनविरोध पार पडेल, याबाबत मोठी चर्चा रंगू लागली आहे.
बारामती विमानतळावर २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा धक्का बसला. नियमांनुसार सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असल्याने निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.
दरम्यान, या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार न देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांनी गेल्या चार दशकांत बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कामामुळे आणि सर्व पक्षांतील नेत्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले होते. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि विशेषतः सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानसभेत पाठविण्याबाबत राजकीय पातळीवर सहमतीचे वातावरण तयार होत असल्याचे दिसत आहे.
महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून सुनेत्रा पवार यांना आधीच पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षदेखील बारामतीत उमेदवार उभा करणार नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने सर्वांचे लक्ष विरोधकांच्या अंतिम भूमिकेकडे लागले आहे.
याचवेळी छोटे पक्ष, स्थानिक संघटना किंवा अपक्ष उमेदवार कोणती भूमिका घेतात, हेही निर्णायक ठरू शकते. बारामतीतील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी काय निर्णय घेतात, यावर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या सर्व घटकांनी शोक व्यक्त केला होता. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याच्या प्रस्तावाला ते कशी प्रतिक्रिया देतात, याकडेही उत्सुकतेने पाहिले जात आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याने बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे किंवा विधानपरिषदेचे सदस्य होणे आवश्यक असल्याने बारामतीतून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
बारामती मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या पोटनिवडणुकीत प्रत्यक्ष लढत होणार की राजकीय परंपरेला अनुसरून सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ही निवडणूक आता चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.


