मुंबई प्रतिनिधी
नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने इयत्ता पहिलीत प्रवेशासाठीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला असून, शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलाचे वय किमान सहा वर्षे पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश देता येणार आहे. या वयोमर्यादेबाबत कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी प्रवेशासाठीची वयोमर्यादा ३१ मार्च अशी होती; मात्र नवीन नियमानुसार ती वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारने डिसेंबर २०२५ मध्ये शासन आदेश जारी केला होता.
राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये हा नियम समानपणे लागू राहणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रकही जारी केले आहे.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, योग्य वयात शिक्षणाची सुरुवात झाल्यास मुलांचा मानसिक व बौद्धिक विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो आणि बालपणातील आनंदही ते अनुभवू शकतात. दरम्यान, प्रवेशाच्या वेळी मुलाचे जन्म प्रमाणपत्र हेच वय सिद्ध करणारे अधिकृत दस्तऐवज मान्य असणार आहे.
प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे इयत्ता पहिली ते आठवी, म्हणजेच ६ ते १४ वर्षे असा मानला जातो.


