हैदराबाद :
येथील पीरजादीगुडा तलावात काही दिवसांपूर्वी मृतदेह सापडलेल्या तेजस्विनी या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. सुरुवातीला तेजस्वीनीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र आता हाती आलेल्या एका विचित्र सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात तेजस्विनी अचानक नग्नावस्थेत परिसरातील एका मंदिरात शिरली. मंदिरात प्रवेश करून तिने तेथील अण्णावारू यांची मूर्ती उचलली आणि ती थेट तलावाच्या दिशेने चालत गेली. फुटेजमध्ये ती विवस्त्रावस्थेत मंदिरात जाताना, मूर्ती उचलताना आणि तलावाच्या दिशेने जाताना स्पष्ट दिसत आहे. यानंतर तिने मूर्तीसह तलावात उडी मारल्याचा संशय आहे. परंतु, तिने पाण्यात उडी मारल्याचा थेट व्हिडिओ उपलब्ध नसल्याने ती मूर्ती नेमकी कुठे गेली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलीस सध्या तलावात मूर्तीचा शोध घेत असून ती सापडल्यास तपासात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तपासादरम्यान तेजस्विनीच्या वास्तव्याबाबत काही खळबळजनक बाबी समोर आल्या आहेत. ती ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती, त्याचे दिवसाचे भाडे ३,५०० रुपये होते. म्हणजेच महिन्याला ती १ लाख रुपयांहून अधिक रक्कम केवळ भाड्यापोटी मोजत होती. विशेष म्हणजे, ती राहत असलेल्या अपार्टमेंटच्या वरच्या दोन मजल्यांवर लॉज चालवला जात होता आणि तिथे विविध प्रकारच्या लोकांची सातत्याने ये-जा असायची. याप्रकरणी पोलिसांनी अपार्टमेंटची पाहणी करून स्थानिकांची चौकशी सुरू केली आहे.
तेजस्विनीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा छडा लावण्यासाठी पोलीस तिच्या खाजगी आयुष्यापासून ते आर्थिक व्यवहारांपर्यंत सर्व बाजूंचा तपास करत आहेत. याच संदर्भात लवकरच तेजस्विनीची आई अरुणा यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


