मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत तिसरी मुंबई उभारण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. अटल सेतू परिसरात आधुनिक पायाभूत सुविधांसह ग्रीनफिल्ड शहर उभारण्याचा सरकारचा मानस आहे.
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मायक्रो प्लॅन मांडला. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि नागरीकरणाचा ताण लक्षात घेऊन नवी मुंबईशेजारी तिसऱ्या मुंबईच्या उभारणीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील Pen परिसर तसेच Navi Mumbai International Airport परिसराचा समावेश असलेल्या भागाचा ग्रीनफिल्ड शहर म्हणून विकास करण्यात येणार आहे. कर्नाळा–साई–चिरनेर, रायगडातील पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर या भागांना ग्रीनफिल्ड विकास केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
यासोबतच मुंबई महानगर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या सुमारे १४० अब्ज डॉलर असलेली अर्थव्यवस्था पुढील काळात ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात मांडण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईतील उद्योग आणि नवउद्योगांना चालना देण्यासाठी वडाळा येथे सुमारे १३० एकर जागेवर जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावरही सरकारने भर दिला आहे. मुंबई – आमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोर अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पातील ठाणे ते तलासरी दरम्यानच्या तीन स्थानकांचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच विरार, बोईसर आणि ठाणे येथील बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे.
राज्याच्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि वाहतूक व्यवस्थेला चालना देत मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.


