सातारा प्रतिनिधी
सातारा : अमली पदार्थांचे उत्पादन आणि पुरवठा करणे हा कायद्याने गुन्हा असून, सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर हालचाली होणार नाहीत, याची पोलीस विभागाने पूर्ण दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘नार्को कोऑर्डीनेशन सेंटर’ (NCORD) समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहायक आयुक्त वर्षा गाडेकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषतः पर्यटन स्थळांच्या सुरक्षेवर भर दिला. ते म्हणाले की, महाबळेश्वर आणि पाचगणी ही राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असून येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथील हॉटेल आणि रिसॉर्ट्सची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही ‘रेव पार्टी’ सारखे अवैध प्रकार आयोजित होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी वर्षभरात केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासोबतच, जिल्ह्यात सध्या एकही शासकीय व्यसनमुक्ती केंद्र उपलब्ध नसल्याने, समाजकल्याण विभागामार्फत केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीच्या दरम्यान, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात राबवलेल्या मोहिमांची आणि केलेल्या कारवायांची सविस्तर माहिती समितीला दिली. अमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


