मुंबई प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरात नव्या महापालिका कार्यकाळाच्या प्रारंभीच नामांतराच्या प्रस्तावांना वेग आला आहे. आगामी २५ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या महापालिका अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच सभेत तब्बल २७ प्रस्ताव मंजुरीसाठी मांडले जाणार असून त्यापैकी २० प्रस्ताव विविध स्थळांच्या नामांतरासंबंधी असल्याने राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेत सत्तास्थापनेनंतर पायाभूत सुविधा, रस्ते-नाले, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, अतिक्रमण नियंत्रण आदी मूलभूत प्रश्नांवर अपेक्षित प्राधान्य न देता नामांतरांना अग्रक्रम दिला जात असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. पावसाळ्यापूर्वीच्या कामांची तातडी असताना नामांतराचा “घाईघाईचा अजेंडा” राबविला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
महापालिकेच्या पहिल्या सभेत मंजुरीसाठी येणाऱ्या नामांतर प्रस्तावांमध्ये पुढील प्रमुख स्थळांचा समावेश आहे :
• वरळी जलतरण तलाव : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव’
• लालबाग, बॉम्बे गॅस लेन मैदान : ‘योगेश पाटील मनोरंजन मैदान’
• घाटकोपर-मानखुर्द मार्गावरील पूल : ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’
• काळा घोडा चौक : ‘सायमन पेरेस चौक’
• अंधेरी (प.) निर्मल हॉटेलजवळील रस्ता : ‘बप्पी लाहिरी मार्ग’
• मुलुंड झुलेलाल मंदिर परिसरातील चौक : ‘श्री झुलेलाल भगवान चौक’
• मालाड (प.) जलतरण तलाव : ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव’
• चेंबूर, सांडू गार्डनजवळील रस्ता : ‘आचार्य श्री महाश्रवण मार्ग क्र. १७’
• पवई जंक्शन : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’
• परळ, आर. एम. भट शाळेजवळील रस्ता : ‘परळची देवी मार्ग’
• कुर्ला (पूर्व) चौक : ‘गौतम साबळे चौक’
या नामांतर प्रस्तावांमुळे राजकीय पातळीवर श्रेयवादाची चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या नव्या कार्यकाळातील पहिलीच सभा विकासाच्या मुद्यांवर केंद्रित राहणार की नामांतरांच्या मंजुरीपुरतीच मर्यादित राहणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


