मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या विधिमंडळाच्या अर्धसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडला. अर्थसंकल्पीय कामकाजाच्या संदर्भातील त्यांच्या कार्यशैलीच्या आठवणींना उजाळा देताना “माझ्याकरता हा अत्यंत भावनिक प्रसंग आहे,” असे फडणवीस म्हणाले.
अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी अधोरेखित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “अधिवेशनाच्या काळात सर्वांत आधी विधानभवनात येणारे नेते म्हणजे दादा. सभागृह कितीही काळ चालले तरी ते आपल्या जागी बसलेले दिसत. यंदा त्यांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता; पुढील वर्षी तेरावा अर्थसंकल्प सादर करून बॅरिस्टर शेषराव यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली असती. कदाचित सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे नेते म्हणून त्यांची नोंद झाली असती; मात्र त्याआधीच ते आपल्यातून निघून गेले. यंदा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली,” असे त्यांनी नमूद केले.
राज्याच्या वित्तीय निर्णयप्रक्रियेत अजित पवार यांची ठाम भूमिका असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, कठोर आर्थिक निर्णय घेण्यास ते कधीही मागेपुढे पाहत नसत. “वित्त विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्थसंकल्पावर मोठा भार पडेल, म्हणून पुनर्विचार सुचविला होता; मात्र अजितदादांनी ठामपणे निर्णय घेत ही योजना सुरू केली,” असे त्यांनी सांगितले.
योजनेनंतर अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली होती, त्याची आठवण करून देताना मुख्यमंत्री म्हणाले, “त्यामुळे आम्हालाही गुलाबी जॅकेट घालावे लागे. आता त्या सर्व गोष्टी आठवणींत उरल्या आहेत. अशा प्रकारचा शोकप्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी असली, तरी माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे.”
सभागृहाने शोकप्रस्तावास मंजुरी देत अजित पवार यांच्या कार्यास आदरांजली वाहिली.


