मुंबई प्रतिनिधी
मुंबईसह देशभरातील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी मोठा डिजिटल बदल होणार असून, भारतीय रेल्वे प्रशासनाने १ मार्च २०२६पासून ‘UTS on Mobile’ अॅप कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी ‘RailOne’ हेच उपनगरीय, प्लॅटफॉर्म, राखीव व अनारक्षित तिकिटांसाठी अधिकृत एकत्रित अॅप म्हणून वापरावे लागणार आहे.
रेल्वेच्या डिजिटल एकत्रीकरण मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या अॅप्समधील सेवा एका व्यासपीठावर आणण्याचा हा निर्णय घेतल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. आतापर्यंत UTS अॅपवर केवळ लोकल तिकीट व मासिक पास उपलब्ध होते; मात्र RailOne अॅपवरून उपनगरीय तिकिटांसह लांब पल्ल्याच्या आरक्षित तिकिटांचीही बुकिंग सुविधा उपलब्ध राहणार आहे.
नव्या अॅपकडे प्रवाशांचे स्थलांतर सुलभ करण्यासाठी १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत RailOne द्वारे डिजिटल पेमेंटने काढलेल्या अनारक्षित तिकिटांवर ३ टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार, UTS किंवा IRCTCशी संलग्न असलेले विद्यमान लॉगिन तपशील RailOneमध्ये वापरता येणार असून स्वतंत्र खाते उघडण्याची गरज नाही. UTS अॅपमधील आर-वॉलेटमधील शिल्लक रक्कम तसेच वैध मासिक पास RailOneवर हस्तांतरित करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
RailOneकडे कसे वळावे?
• अधिकृत अॅप स्टोअरमधून RailOne डाउनलोड करणे
• UTS-नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा IRCTC लॉगिनने साइन-इन करणे
• पहिल्या लॉगिननंतर MPIN किंवा बायोमेट्रिक पर्याय सक्रिय करणे
मुंबई उपनगरीय रेल्वेतील नियमित प्रवाशांनी १ मार्चपूर्वी RailOne अॅप डाउनलोड करून वापर सुरू करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. आगामी काळात लोकल तिकिटे व सीझन पास केवळ RailOneवरूनच उपलब्ध राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.


