मुंबई प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या फिरत्या दुकान योजनेला पुन्हा गती देण्यात आली आहे. निधीअभावी काही काळ रखडलेल्या या योजनेसाठी सरकारने २५ कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यामुळे दिव्यांगांना ई-वाहनावर आधारित फिरते दुकान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ई-टेम्पो मोबाईल शॉप ऑन व्हेईकल पुरवण्यात येते. या पर्यावरणस्नेही फिरत्या दुकानाची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये असून, लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाते. वाहनाच्या अंतर्गत भागात व्यवसायासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
मागील काही महिन्यांपासून या वाहनांसाठी निधी उपलब्ध नसल्याने योजना बारगळली होती. मात्र आता सरकारने स्वतंत्र तरतूद केल्याने जिल्हा परिषदांच्या माध्यमातून हा निधी वितरित केला जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
योजनेचे उद्दिष्ट
दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत रोजगारनिर्मितीला चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कुटुंबासह सन्मानाने जीवन जगण्यास सक्षम करणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकरिता
https://register.mshfdc.co.in
हे नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्याद्वारे अर्ज करता येणार आहे.


