मुंबई प्रतिनिधी
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील १२० सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया गुरुवार, ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
म्हाडा मुंबई मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या या संधीमध्ये यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या; मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश आहे. इच्छुक अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://bookmyhome.mhada.gov.in येथे ऑनलाइन अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
या सदनिकांच्या किमती ३० लाख रुपयांपासून ते आठ कोटी रुपयांपर्यंत असून, विविध उत्पन्न गटांतील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. अर्जदारांना प्रथम संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून, ऑनलाइन अर्ज सादर करणे, अर्ज शुल्क व अनामत रक्कम भरणे, योजना निवड व सदनिका निश्चिती ही प्रक्रिया १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सदनिका निश्चितीनंतर संबंधित विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा ४८ तासांच्या आत करणे बंधनकारक असणार आहे.
कुठे मिळणार सदनिका?
शिंपोली, कांदिवली – ८
चारकोप, सेक्टर-८ – २
अँटॉप हिल – ३५
तुंगा, पवई – ४४
पीएमजीपी, मानखुर्द – १
मालवणी – १
गायकवाड नगर, मालवणी – १
घाटकोपर (पूर्व) – २
कन्नमवार नगर – १
भायखळा – ६
ताडदेव – ६
लोअर परळ – ४
सायन – २
जेव्हीपीडी, अंधेरी (पश्चिम) – ७
मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या सदनिकांमुळे घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना मोठी संधी उपलब्ध झाली असून, ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वामुळे वेळेवर अर्ज करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.


