कराड प्रतिनिधी
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या प्रितीसंगमाला भेट देत आपल्या नव्या राजकीय प्रवासाची औपचारिक सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक अधिष्ठानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या प्रितीसंगमावर उपस्थित राहून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील परंपरा आणि वारसा अधोरेखित केला.

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, मकरंद पाटील आणि रुपाली पाटील ठोंबरे उपस्थित होते.
प्रितीसंगमाला दिलेली भेट ही केवळ औपचारिक नसून पवार कुटुंबीयांच्या दीर्घकालीन राजकीय परंपरेचा भाग मानली जाते. शरद पवार असोत वा अजित पवार,
महत्त्वाच्या राजकीय निर्णयांच्या टप्प्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना साक्ष मानण्याची परंपरा पवार कुटुंबीयांनी जपली आहे. सुनेत्रा पवार यांनीही हीच परंपरा पुढे नेल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.
शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक वाटचालीवर यशवंतरावांच्या विचारांचा ठसा आजही ठळकपणे दिसतो. त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची ही उपस्थिती पक्षातील त्यांच्या भूमिकेला राजकीय आणि वैचारिक अधिष्ठान देणारी ठरते.
दरम्यान, प्रितीसंगमावरील कार्यक्रमानंतर सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना झाल्या. तेथे त्या दिवंगत विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक होते. एका विमान अपघातात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर आणि सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांची भेट ही संवेदनशील आणि मानवी नातेसंबंध जपणारी ठरणार आहे.
सुनेत्रा पवार यांचा हा दौरा केवळ औपचारिक न राहता, परंपरा, संवेदना आणि राजकीय संदेश यांचा समन्वय साधणारा ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


