नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवीन वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांसाठी केवळ दिनदर्शिकेपुरती मर्यादित न राहता थेट दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या नियमबदलांनी झाली आहे. १ जानेवारी २०२६ पासून केंद्र सरकार, बँकिंग क्षेत्र, करप्रणाली तसेच डिजिटल व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. पगारदार, शेतकरी, नोकरदार, पेन्शनधारक, बँक ग्राहक आणि गॅस वापरकर्ते अशा सर्व घटकांवर या बदलांचा परिणाम होणार आहे.
आजपासून नेमके कोणते बदल लागू झाले आहेत, याचा सविस्तर आढावा.
आधार–पॅन लिंकची अंतिम मुदत संपली
आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत संपली आहे. ज्यांनी अद्याप आधार–पॅन लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय (Inoperative) ठरणार आहे. अशा व्यक्तींना बँक व्यवहार, कर विवरणी दाखल करणे तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
नवीन आयटीआर फॉर्म लागू
आयकर विवरणी (ITR) भरण्यासाठी नवीन फॉर्म आजपासून लागू झाले आहेत. या नव्या फॉर्ममध्ये करदात्यांना बँक व्यवहार, मोठे खर्च, गुंतवणूक आणि उत्पन्नाचे तपशील अधिक सखोलपणे नमूद करावे लागणार आहेत. करप्रणाली अधिक पारदर्शक करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन करकायदा १ एप्रिलपासून
केंद्र सरकार इन्कम टॅक्स अॅक्ट, १९६१ रद्द करून नवीन करकायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. हा कायदा १ एप्रिल २०२६ पासून अंमलात येण्याची शक्यता असून, कररचना अधिक सोपी आणि स्पष्ट करण्यावर भर देण्यात येणार आहे.
आठवा वेतन आयोग लागू
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आठवा वेतन आयोग आजपासून लागू झाला आहे. यामुळे सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना थेट लाभ होणार असून, वेतन व पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे.
पीएम किसान योजनेत फार्मर आयडी बंधनकारक
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये हा नियम आधीच लागू असून, भविष्यात संपूर्ण देशात तो लागू होणार आहे. फार्मर आयडी नसलेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.
क्रेडिट स्कोअर अपडेटच्या नियमात बदल
आतापर्यंत दर महिन्याला अपडेट होणारा क्रेडिट स्कोअर आता अधिक वारंवार अपडेट केला जाणार आहे. यामुळे कर्जदारांच्या पतक्षमतेचे मूल्यांकन अधिक अचूक होणार असून, कर्ज आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवर याचा परिणाम होईल.
बँक आणि एफडी व्याजदरात बदलाची शक्यता
नवीन वर्षात बँकांच्या ठेवी व कर्ज व्याजदरात बदल होण्याची शक्यता आहे. एफडीवरील व्याजदर वाढ–कपात केल्यास बचतदार आणि कर्जदार दोघांवरही त्याचा थेट परिणाम होणार आहे.
एलपीजी गॅसच्या दरात वाढ
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या आढाव्यानुसार, आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत १११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅसच्या किमती स्थिर असल्या तरी हॉटेल, उपाहारगृहे आणि व्यावसायिक वापरकर्त्यांवर या वाढीचा परिणाम होणार आहे.
व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसाठी नवे नियम
डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसाठी फोन नंबर बंधनकारक करण्यात आला आहे. संबंधित मोबाइल नंबर किमान ९० दिवस सक्रिय असणे आवश्यक आहे. यामुळे बनावट खाते आणि फसवणूक रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.
इंधन दरांमध्ये बदल
आजपासून एव्हिएशन फ्युएल (ATF) दरांमध्ये बदल झाला आहे. हे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. भविष्यात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी लागू झालेल्या या नियमबदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागणार आहे. नियमांची माहिती ठेवणे आणि वेळेत पूर्तता करणे, हाच या बदलांचा परिणाम टाळण्याचा मार्ग ठरणार आहे.


