नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून, हा आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सेवारत तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
दर दहा वर्षांनी स्थापन होणारा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेचा आढावा घेतो. वाढती महागाई, जीवनावश्यक खर्च आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन वेतनात सुधारणा करणे, हा या आयोगाचा मुख्य उद्देश असतो. आठव्या वेतन आयोगांतर्गत पगारवाढीसोबतच महागाई भत्ता (डीए), विविध भत्ते आणि पेन्शनमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे.
सुमारे दीड कोटी लाभार्थी
या वेतन आयोगाचा लाभ सुमारे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी (संरक्षण दलांसह) आणि सुमारे ६५ लाख निवृत्त पेन्शनधारकांना (संरक्षण निवृत्तांसह) मिळणार आहे. त्यामुळे देशातील मोठ्या लोकसंख्येच्या उत्पन्नात थेट वाढ होणार असून, याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेवरही दिसून येण्याची शक्यता आहे.
कोणाला किती फायदा?
आठव्या वेतन आयोगांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण १८ वेतन स्तरांमध्ये विभागण्यात आले आहे. त्यानुसार वेतनवाढीचे प्रमाण बदलणार आहे.
स्तर १: प्रवेश-स्तर / गट ड कर्मचारी
स्तर २ ते ९: गट क कर्मचारी
स्तर १० ते १२: गट ब कर्मचारी
स्तर १३ ते १८: गट अ कर्मचारी
तज्ज्ञांच्या मते, फिटमेंट फॅक्टर २.१५ निश्चित करण्यात आल्यास पगारात मोठी झेप दिसून येईल. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ पगारावर किती पटीने वाढ केली जाणार, हे ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे.
फिटमेंट फॅक्टर २.१५नुसार संभाव्य वेतनवाढ
आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी वाढ पुढीलप्रमाणे असू शकते-
स्तर १:
सध्याचा पगार – १८,००० रुपये
वाढलेला पगार – ३८,७०० रुपये
फरक – २०,७०० रुपये
स्तर ५:
सध्याचा पगार – २९,२०० रुपये
वाढलेला पगार – ६२,७८० रुपये
फरक – ३३,५८० रुपये
स्तर १०:
सध्याचा पगार – ५६,१०० रुपये
वाढलेला पगार – १,२०,६१५ रुपये
फरक – ६४,५१५ रुपये
स्तर १५:
सध्याचा पगार – १,८२,२०० रुपये
वाढलेला पगार – ३,९१,७३० रुपये
फरक – २,०९,५३० रुपये
स्तर १८:
सध्याचा पगार – २,५०,००० रुपये
वाढलेला पगार – ५,३७,५०० रुपये
फरक – २,०९,५३० रुपये
अर्थव्यवस्थेलाही चालना
वेतनवाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढणार असून, ग्राहक खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा किरकोळ व्यापार, सेवा क्षेत्र आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, पुढील काही महिन्यांत भत्ते आणि इतर सुधारित तरतुदींबाबत अधिकृत अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा आहे.


