नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा कपात केली असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर आहेत.
सरकारी कंपन्या आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी किमतींचा आढावा घेतात. त्यानुसार १ डिसेंबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १० रुपयांनी कमी करण्यात आल्या. दिल्लीमध्ये या सिलिंडरची किंमत आता १५८०.५० रुपये असून नोव्हेंबरमध्ये ती १५९०.५० रुपये होती.
गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅसच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. ऑक्टोबरमध्ये १५.५० रुपयांची वाढ झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ५ रुपये आणि आता पुन्हा डिसेंबरमध्ये १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही. दिल्लीतील घरगुती सिलिंडरची किंमत अद्याप ८५३ रुपये आहे.
मुंबई-पुण्यातील दर किती?
मुंबई आणि पुण्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,५३१.५० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. कोलकाता येथे १,६८४ रुपये, तर चेन्नईत १,७३९.५० रुपये इतकी किंमत आहे. घरगुती गॅसच्या किमती मागील ८ एप्रिलपासून स्थिर असून मुंबईत ८५२.५० रुपये, कोलकात्यात ८७९ रुपये आणि चेन्नईत ८६८.५० रुपये दर कायम आहे.
एटीएफच्या किमतीत वाढ
दरम्यान, विमान इंधनाच्या (एटीएफ) दरात वाढ झाली आहे. दिल्लीतील एटीएफची किंमत आता ८६४.८१ डॉलर प्रति किलोलिटर झाली असून त्यानुसार १,००० लिटर इंधनासाठी जवळपास ९९,६७७ रुपये मोजावे लागतील. मुंबईतही एटीएफची किंमत ८६४.३५ डॉलरपर्यंत पोहोचली आहे.


