सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, याबाबतचा ताणतणाव आणि अटकळ अखेर सोमवारपर्यंत संपुष्टात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विश्वासू आणि जनता सहकारी बँकेचे चेअरमन तसेच माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मोहिते यांनी ए, बी फॉर्मसह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांच्याकडे दाखल केला.
यापूर्वी सातारा विकास आघाडीचे उमेदवार संग्राम बर्गे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, शेवटच्या क्षणी हे नाव मागे पडल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटात नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत गेल्या. दरम्यान, दोन्ही राजांच्या बाजूने शहराध्यक्षपदासाठी काही नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात आली होती. त्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमोल मोहिते यांच्या नावाला पसंती देत आमदार गटाचा प्रभाव अधिक ठळक केला.
नगरपालिकेच्या 50 जागांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. छत्रपती शिवाजी सभागृहात 213 उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली. तर नगराध्यक्षपदासाठी 19 अर्ज दाखल झाले असून अधिकृत आकडा सायंकाळी घोषित होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कडक पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया पार पडली.
भाजपचा उमेदवारीवरील सस्पेन्स कायम
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने नगराध्यक्षपदाचा निर्णय शेवटपर्यंत गुप्त ठेवला होता. गेल्या 25 वर्षांत सातार्याच्या राजकारणावर उदयनराजे यांचा प्रभाव राहिला असून नगराध्यक्षपदी त्यांच्या गटाचे वर्चस्व टिकून होते. त्यामुळे यंदाही संग्राम बर्गे यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा जोरात होती. नगरविकास आघाडीतही अविनाश कदम आणि अमोल मोहिते ही नावे चर्चेत होती.
दोन्ही राजांची दोन दिवस चाललेली मॅरेथॉन बैठकाही निष्फळ ठरली. रविवारी वाढे फाटा परिसरातील हॉटेलमध्ये झालेल्या तीन तासांच्या चर्चेनंतरही उमेदवारीवर तोडगा लागला नाही. शेवटी सोमवारी दुपारी शिवेंद्रसिंहराजे मोहितेंसह पालिकेत दाखल झाले, तेव्हाच त्यांच्या नावावर अंतिम मुदतबंद झाले.
“फक्त भाजप, हा एकच फॉर्म्युला” ‘ शिवेंद्रसिंहराजे
अर्ज दाखल केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे सातार्यात 300 कोटींपेक्षा अधिक निधी विकासकामांसाठी मिळाला. विधानसभा व लोकसभा निवडणुकांप्रमाणेच पालिकेतही भाजपचाच नगराध्यक्ष आणि भाजपचेच वर्चस्व राहावे, यासाठी प्रयत्नशील आहोत.”
सातारा पालिकेतील सत्तासमीकरणांत भाजपने शेवटच्या क्षणी डाव साधल्याचे चित्र स्पष्ट झाले असून पुढील काही दिवसांत राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.


