उमेश गायगवळे
भाऊबीजचा दिवस.
घराघरात उजळलेले दिवे, आनंदाचे वातावरण, सख्ख्या भावंडांच्या प्रेमाचा उत्सव. पण त्याच दिवशी साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील एका छोट्या हॉटेलमध्ये काळोख उतरला, डॉक्टर संपदा मुंडे नावाच्या तरुणीने गळफास लावून आपले आयुष्य संपवलं.
क्षणभरात सातारा स्तब्ध झाला, महाराष्ट्र हादरला.
आई-वडील शेतकरी. चार भावंडांमध्ये लाडकी मुलगी. जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून लोकांची सेवा करण्याचं स्वप्न पाहणारी तरुणी. उपजिल्हा रुग्णालयात दोन वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणारी वैद्यकीय अधिकारी.
आणि अखेर…
त्याच रुग्णालयातल्या राजकीय दबाव, पोलिसी अत्याचार आणि व्यवस्थेच्या गुदमरवणाऱ्या जाचामुळे एका जिवंत कर्तव्यनिष्ठ मुलीने आत्महत्या केली.
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” की “सत्तेच्या सावलीत अन्यायाचं रक्षण”?
महाराष्ट्र पोलिसांविषयी बोलताना नेहमी अभिमान वाटतो. या राज्याने देशाला अनेक शूर, प्रामाणिक अधिकारी दिले. पण त्याच व्यवस्थेत काहींच्या वर्तणुकीने “रक्षकच भक्षक झाले”, हे सत्य पुन्हा एकदा उघड झालं आहे.
डॉ. संपदा मुंडे प्रकरण हे केवळ आत्महत्येचं नाही, तर प्रशासनातील सडलेल्या बेड्यांचं प्रतिबिंब आहे.
पोलिस आणि राजकारणाच्या साटेलोट्यात एखाद्या निरपराध डॉक्टरवर किती अमानवी दबाव आणला जाऊ शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही घटना.
“पोस्टमार्टम रिपोर्ट तसा द्या, नाहीतर परिणाम भोगाल”
ही वाक्यं कल्पना नाहीत, संपदाने अनुभवलेलं वास्तव आहे.
तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं, की गेल्या वर्षभरापासून तिच्यावर राजकीय नेते आणि पोलिस अधिकारी पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणत होते.
शवविच्छेदन अहवाल त्यांच्या सोयीचा लागावा, गुन्ह्यांचा रंग बदलावा, आरोपींचं नाव वाचावं अशा ‘आदेशां’चा तिला रोज सामना करावा लागत होता.
तिने विरोध केला. तिने वरिष्ठांना तक्रारी दिल्या.
पण त्या तक्रारी फाईलमध्येच दडपल्या गेल्या.
कारण ज्यांच्याविरुद्ध ती तक्रार करत होती, तेच तपास करणारे अधिकारी होते!
कुंपणानेच शेत खाल्लं.
सुसाईड नोटमध्ये लिहिलं “पोलिस निरीक्षकाने चार वेळा बलात्कार केला”
संपदाच्या हातावर पेनाने लिहिलेली शब्दं कोणाचंही हृदय चिरून टाकतील.
“पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर यांनी मला मानसिक छळ दिला.”
इतकं स्पष्ट आणि भयावह आरोप स्वतःच्या शरीरावर लिहून गेलेली ती डॉक्टर, तिच्या वेदनेची भाषा शब्दांत सांगता येणं कठीण आहे.
या नोंदीतलं प्रत्येक अक्षर आरडं ओरडतं “माझ्यावर अन्याय झाला आहे.”
पण तिला ऐकणारे कोणी नव्हते.
तीने चार महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली होती, पण गुन्हा दाखल झाला नाही. ते पत्रही समाज माध्यमावर वायरल होत आहे.
आता तीच फाईल ‘पुरावा’ म्हणून बंद लिफाफ्यात पडून आहे.
“खासदारांच्या पीएचा फोन आला होता…”
कुटुंबीयांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला
एका खासदारांच्या दोन पीएंकडून संपदाला फोन करून दबाव आणण्यात आला होता.
“रिपोर्ट आमच्या म्हणण्यानुसार द्या, नाहीतर बघून घेऊ,” असे इशारे तिला वारंवार मिळाले.
तीने या सर्वाचा उल्लेख आपल्या पत्रात केला होता.
पण पुन्हा एकदा “पत्र पोहोचलं, पण न्याय नाही.”
सुट्टी घेऊन घरी जाणार होती, पण मृतदेह गेला गावी
संपदा पुढच्या आठवड्यात भाऊबीजेच्या निमित्ताने सुट्टी घेऊन बीडच्या गावी जाण्याची तयारी करत होती.
आईने फोनवर विचारलं, “कधी येणार गं?”
आणि काही दिवसांनी त्या आईच्या कुशीत मुलगी नव्हे, मुलीचा मृतदेह परतला.
आईचा हंबरडा आणि भावाच्या डोळ्यातला जळता प्रश्न
“माझ्या बहिणीचा गुन्हा काय होता?”
मुख्यमंत्री अँक्शन मोडमध्ये, पण न्याय कुठे आहे?
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिस अधीक्षकांकडून अहवाल मागवला, आणि आरोपी पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
पण केवळ निलंबन पुरेसं आहे का?
संपदाच्या पत्रात उल्लेखलेल्या खासदारांच्या पीएंची चौकशी कोण करणार?
पोलिसांनी दुर्लक्ष का केलं?
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे कानाडोळा का केला?
हे प्रश्न फक्त महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देश विचारत आहे.
पोलिसयंत्रणेला आरसा दाखवणारा प्रसंग
एक डॉक्टर, जिला लोकांचे जीव वाचवायचे होते,
तिलाच स्वतःचा जीव वाचवता आला नाही.
ही घटना आरोग्य विभागातील असंवेदनशीलता आणि पोलिस यंत्रणेतील दबाव संस्कृतीचं गालबोट आहे.
अशा प्रत्येक प्रकरणात आपण एखादं व्यक्तीगत आयुष्य नाही, तर व्यवस्थेची माणुसकी गमावत आहोत.
“संपदासाठी न्याय” ही केवळ मागणी
संपदा मुंडे ही एक नाव नाही, ती प्रत्येक त्या तरुणीचा चेहरा आहे जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, आणि त्याची किंमत प्राणाने चुकवते.
जर या प्रकरणात कठोर, निष्पक्ष चौकशी झाली नाही तर समाजाला कोणता संदेश जाईल?
की अन्यायाविरुद्ध बोलणं म्हणजे आत्महत्येचा मार्ग?
“कुंपणानेच शेत खाल्लं” न्यायाची पायवाट बंद करणारी यंत्रणा
राज्य पोलिसांच्या वर्दीवर लिहिलेली ओळ “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”
म्हणजेच “सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश”.
पण इथे चित्र उलटं आहे.
ज्या रक्षकांनी तिचं रक्षण करायचं, तेच तिचे भक्षक बनले.
कुंपणानेच शेत खाल्लं…
डॉ. संपदा मुंडे गेली दोन वर्ष फलटण उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत होती.
अतिशय प्रामाणिक, जबाबदार, शांत आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून तिचं नाव ओळखलं जायचं.
रुग्णालयातल्या सहकाऱ्यांना आजही आठवतं
ती नेहमी म्हणायची, “रुग्णावर अन्याय होऊ नये, त्याचा रिपोर्ट प्रामाणिक असला पाहिजे.”
पण हाच प्रामाणिकपणा तिच्या मृत्यूचं कारण ठरला.
कुंपणाचं काय करायचं?
डॉक्टर संपदाचं आयुष्य संपलं, पण तिचं प्रकरण हा एक प्रश्न बनून जिवंत आहे.
जेव्हा रक्षणाची शपथ घेतलेलेच अन्यायाचं रक्षण करतात,
तेव्हा लोकांचा कायद्यावरचा विश्वास कसा टिकणार?
म्हणूनच आज प्रत्येक नागरिक विचारतो
“कुंपणानेच शेत खाल्लं, तर शेतकऱ्याने कुणाकडे न्याय मागायचा?”


