उमेश गायगवळे, मुंबई
‘घटनास्थळी सन्नाटा… काळाचौकीत रक्ताचा सडा, आणि प्रेमाचा शेवट’
शुक्रवारी सकाळी काळाचौकी परिसरातील आंबेवाडीतील रस्त्यावर जे घडलं, त्याने मुंबई हादरली.
मनिषा यादव (२२) हिला तिच्या प्रियकराने, सोनू बराय (२४) चाकूने वार करत गंभीर जखमी केलं आणि लगेचच स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या केली. काही तासांनंतर, उपचारादरम्यान मनिषाचाही मृत्यू झाला.

त्या रस्त्यावर अजूनही रक्ताचे डाग सुकलेले आहेत, आणि त्या गल्लीत आजही एकच प्रश्न फिरतो “असं का घडलं?”
प्रेमातून निर्माण झालेली भीती
आंबेवाडीतील एका छोट्या गल्लीतील ही प्रेमकहाणी.
दोघेही एकाच परिसरात वाढलेले, एकमेकांना ओळखणारे, स्वप्नं शेअर करणारे. काही काळ सर्व काही ठीक होतं, पण मग सोनूच्या मनात संशयाचा विषाणू शिरला.
“ती दुसऱ्या कुणाशी बोलते…” या एका विचाराने त्याचं आयुष्य व्यापलं.
गेल्या आठवड्याभरात दोघांमध्ये भांडणं वाढली. मनिषाने संबंध संपवण्याचा निर्णय घेतला, पण सोनूला ते मान्य नव्हतं.
तो संताप, तो अहंकार आणि ती असहायता, ह्यांनी एकाच क्षणात सर्व काही संपवलं.
‘आस्था नर्सिंग होम’मध्येही हल्ला
सकाळी सोनूने मनिषाला भेटायला बोलावलं. दोघांमध्ये रस्त्यावर वाद झाला. वाद वाढताच त्याने चाकू बाहेर काढला.
गंभीर जखमी झालेली मनिषा धावतपळत जवळच्याच ‘आस्था नर्सिंग होम’मध्ये गेली.
पण सोनू थांबला नाही, तोही मागोमाग आत शिरला आणि पुन्हा तिच्यावर वार केले.
यानंतर, सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्याने स्वतःचाही गळा चिरला.
तिथले डॉक्टर आणि नागरिक हादरले. रक्ताच्या डागांवर पाय ठेवत मदतीसाठी धावणारे लोक, आणि काही क्षणांत संपलेलं आयुष्य, ही दृश्यं शब्दात मावणारी नव्हती.

“ती वाचेल का?” डॉक्टरांचा प्रयत्न निष्फळ
दोघांना तत्काळ केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं.
सोनूला दाखल होताच मृत घोषित करण्यात आलं.
मनिषाला पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं.
डॉक्टरांनी रक्तस्त्राव रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण सायंकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
एका क्षुल्लक शंकेने दोन आयुष्यं संपवली
एकानं आत्महत्या केली, आणि दुसरी ‘विश्वासघाताची शिक्षा’ न देता तरी त्याच्याच हाताने संपली.
परिसरातील सन्नाटा आणि समाजाची अपराधी भावना
आंबेवाडीतील गल्ली आज शांत आहे. भिंतींवर अजूनही हळहळ व्यक्त करणारे चेहरे दिसतात.
“दोघेही चांगले होते, एकत्र फिरायचे… मग असं काय झालं?” स्थानिक रहिवासी अवाक आहेत.
काळाचौकी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार “संशयातून झालेला हल्ला” असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पण या घटनेनं पुन्हा एकदा आपल्या समाजाला प्रश्न विचारला आहे
प्रेमाचं रूप इतकं हिंस्र का झालंय?
संशय, नात्यांचा निःशब्द खुनी
आज सोशल मीडियाच्या युगात नाती अधिक जवळ येतात, पण मनं मात्र अधिक असुरक्षित बनतात.
फोनवरील ‘लास्ट सीन’, ‘ऑनलाइन स्टेटस’ किंवा कुणाचं ‘लाइक’ यावरून निर्माण होणारे गैरसमज आज जीवघेणे ठरत आहेत.
प्रेमाचं नातं विश्वासावर टिकतं, पण जर त्याचं मोजमाप नियंत्रणावर झालं, तर ते प्रेम राहात नाही, ते एक विष बनतं.
मनिषा आणि सोनूच्या प्रकरणातही हेच घडलं.
संवाद हरवला, आणि संशयाने त्याची जागा घेतली.
पोलिसांची चौकशी सुरू, पण समाजाचा अभ्यास कुठे?
अशा घटना दर काही महिन्यांनी घडतात.
पोलिस येतात, चौकशी करतात, आरोपपत्र तयार होतं.
माध्यमं काही दिवस बोलतात, आणि मग शांतता.
पण या शांततेच्या आड समाजाची संवेदनशीलता मरते.
नातेसंबंधातील हिंसेकडे आपण अजूनही “प्रेमात वेडेपणा झाला” म्हणून दुर्लक्ष करतो.
पण प्रत्येक अशा घटनेतून आवाज उठतो
“मला कुणीतरी ऐकायला हवं होतं.”
मौनाचा गुन्हा आणि समाजाची जबाबदारी
मनिषा आणि सोनूच्या मृत्यूची कारणं गुन्हेगारी स्वरूपाची असली तरी मुळात ती भावनिक असंतुलनाची शोकांतिका आहे.
आपला समाज आजही अशा विषयांवर मौन पाळतो.
शाळांमध्ये भावनिक शिक्षण नाही, कुटुंबात संवाद नाही, आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष नाही.
सोनूला जर कोणीतरी ऐकून घेतलं असतं, त्याला मदत मिळाली असती, तर तो कदाचित या टोकाला गेला नसता.
मनिषाने जर भीतीशिवाय पोलिसांकडे मदत मागता आली असती, तर ती आज जिवंत असती.
प्रेम सुंदर आहे, पण संशय त्याचं रक्त शोषतो.
आज गरज आहे, संवादाची, सहानुभूतीची, आणि मानसिक आरोग्याकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची.
मनिषा आणि सोनू गेले… पण त्यांनी विचारायला भाग पाडलं आहे
“आपण प्रेम करायला शिकतो, पण समजून घ्यायला का नाही?”


