
संभाजीनगर प्रतिनिधी
अतिवृष्टी, नापिकी आणि वाढतं कर्ज या तिहेरी संकटात सापडलेल्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने दिवाळीच्या तोंडावर जीवनयात्रा संपवली. तुपेवाडी तांडा (ता. पैठण) येथील नामदेव लालसिंग राठोड (वय ४५) या शेतकऱ्याने रविवारी (ता. १९) स्वतःच्या घरासमोर विष प्राशन करून आत्महत्या केली. अंगावर तब्बल आठ लाखांचं कर्ज आणि दिवाळीच्या बाजारासाठी हातात पैसा नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे.
नामदेव राठोड यांच्या तुपेवाडी शिवारात गट क्रमांक ७४ मध्ये दोन एकर शेती होती. या जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, सलग नापिकी आणि यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठं नुकसान झालं. त्यामुळे राठोड कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलं. एकीकडे बँक आणि सावकारांचे कर्ज, तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात घरच्या मंडळींसाठी काहीही करता न आल्याने ते मानसिक तणावाखाली होते.
राठोड यांनी रविवारी सकाळी घरासमोरच विषारी औषध प्राशन केलं. त्यांना तातडीने घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आलं; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने तुपेवाडी तांडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राठोड यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया चे ६० हजार, पारुंडी विविध सेवा सोसायटीचे ४० हजार आणि इतर सावकारी असे एकूण सुमारे आठ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
“माझ्या पतीवर बँक आणि सावकारी मिळून सुमारे आठ लाखांचं कर्ज होतं. अतिवृष्टीने पिकं गेली, हातात पैसा नव्हता. दिवाळीच्या खरेदीसाठीही काहीच नव्हतं… म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं.”
शोभा नामदेव राठोड, मयत शेतकऱ्यांची पत्नी
या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक अडचण आणि सरकारी मदतीच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.