
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महसूल विभागात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तब्बल १७०० तलाठी पदांची भरती राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या भरती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला असून, महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये तलाठी पदे रिक्त आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाचे कामकाज अडचणीत आले होते. शासनाने आता ही रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या भरती प्रक्रियेबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
२०२३ च्या भरतीतील अडचणींचा धडा
२०२३ साली झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत काही गैरप्रकार आणि तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. विशेषतः पेसा क्षेत्रातील पदांवर नियुक्तीच्या बाबतीत न्यायालयीन वाद निर्माण झाला होता. सध्या त्या प्रकरणावर न्यायालयाचा निकाल प्रलंबित असून, शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना तात्पुरते ११ महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. न्यायालयीन निर्णयानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
महसूल सेवकांसाठी ‘राखीव’ दिलासा
महसूल सेवकांनी दीर्घकाळापासून आपल्या मागण्या शासनापुढे मांडल्या होत्या. त्यात चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करण्याची आणि मानधनाऐवजी नियमित वेतन मिळण्याची मागणी होती. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
वेतनश्रेणी लागू करणे सध्या शक्य नसल्याने, महसूल सेवकांना तलाठी भरती प्रक्रियेत काही जागा राखीव ठेवणे आणि अनुभवानुसार अतिरिक्त गुण देणे या पर्यायावर विचार सुरू आहे. या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून, महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
उच्चस्तरीय बैठक मंत्रालयात
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मिना, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महसूल सेवकांचे उपोषण मागे घेतल्यानंतर झालेल्या या चर्चेत पर्यायी व्यवस्था म्हणून राखीव जागांचा प्रस्ताव पुढे आला आहे.
राज्यातील महसूल विभागातील ही भरती गेल्या काही काळापासून प्रतीक्षेत होती. आता शासनाने त्याला गती देण्याचा निर्णय घेतल्याने तरुण उमेदवारांना नोकरीची नवी संधी मिळणार आहे.