
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारमधील मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे. तथापि, महायुतीतील मंत्रिमंडळात फेरबदल होणार नसल्याचं संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक मंत्र्याच्या कामाचा परफॉर्मन्स तपासण्यासाठी सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या ऑडिटच्या माध्यमातून मागील वर्षभरात कोणत्या खात्याने किती कामगिरी केली, याचा अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे.
या वृत्तावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट म्हणजे फक्त कामांचा आढावा. मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाचा सध्या कोणताही विचार नाही. आमचं लक्ष सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आहे,” असं त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवादात सांगितलं.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात फडणवीस म्हणाले की, “मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शिंदे – अजित पवार गट) एकत्र लढणार आहेत.” मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाण्यातही महायुती एकत्र येईल का, याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं त्यांनी सूचित केलं.
राज्यात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर काही ठिकाणी मतभेद दिसून येत आहेत. हे मतभेद आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कितपत टोकाला जातात आणि नेतृत्व त्यावर कसं नियंत्रण आणतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.