
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावात ऐन दिवाळीच्या काळात अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागी पांढऱ्या फडक्यात जनावराचं काळीज ठेवलेलं आढळलं असून त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीचं कापलेलं झाड ठेवण्यात आल्याचे दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला असून ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अशा अघोरी विधीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हा प्रकार इंगळी गावाच्या ओढ्यावर, गावाच्या मुख्य कमानीजवळ घडला. विशेष म्हणजे या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. “जो कोणी हा अघोरी प्रकार केला आहे, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही असा प्रकार करण्याचं धाडस करू नये,” अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंगळीचे शिवसेना प्रमुख केशव नारायण पाटील यांनी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.