
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये पोलिसांकडून सुरू असलेल्या गुन्हेगारांविरोधातील धडक मोहिमेदरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक पवन पवार, त्याचा भाऊ विशाल पवार आणि साथीदार कल्पेश किरवे या तिघांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात एका वृद्ध महिलेचे अपहरण आणि आर्थिक लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०२३ मध्ये ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेच्या पतीच्या निधनानंतर पवन पवार आणि त्याच्या साथीदारांनी तिला संपत्तीच्या बहाण्याने फसवले. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात चाकूचा धाक दाखवत महिलेचे अपहरण करून, तिच्याकडून जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्या. पतीच्या नावे असलेली मालमत्ता विशाल पवार यांच्या नावाने तयार केलेल्या नोटरी कागदावर महिलेच्या सह्या घेऊन, तिला सेंट्रल बँकेत वीस लाख रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले.
यानंतर बळजबरीने ती रक्कम तात्काळ परत काढून घेतली गेल्याचे समोर आले आहे. पवन पवारची परिसरात मोठी दहशत असल्याने वृद्ध महिला दीर्घकाळ तक्रार दाखल करू शकली नव्हती. मात्र, अलीकडे पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात केलेल्या धडक कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी त्या महिलेला धीर दिला आणि अखेर तिने तक्रार नोंदवली.
त्यानंतर पवन पवार, विशाल पवार आणि कल्पेश किरवे या तिघांविरुद्ध अपहरण, धमकी आणि लूट यांसह संबंधित कलमानुसार अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.