पिंपरी प्रतिनिधी
जर तुमच्याकडे २० वर्षांहून जुनी गाडी असेल, तर आता तुमचा खिसा रिकामा होणार हे नक्की! केंद्र सरकारनं वाहन पुनर्नोंदणीसाठीचे शुल्क थेट दुप्पट केलं असून, त्यामुळे जुन्या वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
अनेक नागरिक आपली वाहने जपून वर्षानुवर्षे वापरतात. काहींच्या गाड्या अजूनही उत्तम स्थितीत आहेत. परंतु, मोटार वाहन कायद्यानुसार १५ वर्षांनंतर वाहनांची पुनर्नोंदणी अनिवार्य आहे. आतापर्यंत १५ वर्षांनंतर पाच वर्षांसाठी वाहनांची पुनर्नोंदणी करता येत होती. मात्र, केंद्र सरकारने कायद्यात बदल करून २० वर्षांहून जुन्या वाहनांसाठी नोंदणी शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, अशा वाहनांवर पर्यावरण शुल्क आकारले जाणार आहे. पुनर्नोंदणीसाठी उशीर झाल्यास दंडही ठोठावला जाणार आहे, ‘दुचाकीसाठी दरमहा ₹३०० तर चारचाकीसाठी ₹५०० इतका दंड आकारला जाईल.
हजारो नागरिक अजूनही वापरताहेत जुनी वाहने
गेल्या काही वर्षांत वाहन कर्ज सहज उपलब्ध झाल्याने नागरिकांनी नवी वाहने घेण्याकडे कल वाढवला आहे. मात्र, निम्न व मध्यमवर्गीय नागरिक तसेच वाहनांविषयी जिव्हाळा असलेले अनेकजण अजूनही आपली जुनी वाहने जपून ठेवतात. पिंपरी-चिंचवड परिसरात अशा वाहनांची संख्या लक्षणीय आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आकडेवारीनुसार, सुमारे ३२ हजार वाहने १५ वर्षांहून जुनी आहेत, तर त्यातील मोठा हिस्सा २० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचा आहे.
विंटेज गाड्यांचा चाहतावर्गही कायम
जुन्या बुलेट, यामाहा आरएक्स १००सारख्या दुचाकी आजही वाहनप्रेमींच्या पसंतीस आहेत. काही जण तर या विंटेज गाड्यांवर प्रचंड खर्च करून त्या उत्तम स्थितीत ठेवतात. शहरात विंटेज कार बाळगणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
२० वर्षे जुन्या वाहनांसाठी नव्या नोंदणी शुल्काचे दर
वाहन प्रकार शुल्क (रुपये)
दुचाकी ₹२,०००
तीनचाकी ₹५,०००
चारचाकी ₹१०,०००
इतर वाहने ₹१२,०००


