पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे खासगी शिकवणी वर्गात शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्याच मित्राने चाकूहल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षक वर्गात अध्यापन करत असतानाच आरोपी विद्यार्थ्याने अचानक बॅगेतून चाकू काढून मित्राच्या गळ्यावर आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर हल्लेखोर विद्यार्थी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या घटनेमागे तीन महिन्यांपूर्वी झालेला वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. त्या वेळी हा वाद पालक किंवा पोलिसांपर्यंत पोहोचला असता, तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) अमोल मांडवे यांनी दिली.
आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. वर्ग सुरू असताना आरोपी विद्यार्थी अचानक उठला आणि शेजारी बसलेल्या मित्रावर चाकूने सपासप वार केले. काही क्षणांतच वर्गात एकच गोंधळ उडाला. इतर विद्यार्थी भयभीत अवस्थेत होते. जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांचा काही उपयोग झाला नाही.
हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून पसार झाल्याची माहिती असून त्याचा शोध घेण्यासाठी राजगुरूनगर पोलीस पथकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून खासगी क्लासमधील शिक्षक, विद्यार्थी आणि इतर साक्षीदारांची चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे खासगी शिकवणी वर्गांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवावा, त्यांच्या मित्रपरिवाराबाबत, वावराबाबत माहिती घ्यावी आणि कोणताही वाद, बदलती वर्तणूक किंवा संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


