पुणे प्रतिनिधी
पुणे : यूकेमध्ये नोकरी लागल्यानंतर संदर्भपत्र न मिळाल्याने नोकरी गमावल्याचा आरोप करत प्रेम बिऱ्हाडेला (प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे) पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर जातीय भेदभावाचे आरोप केले आहेत. या आरोपांवर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी स्पष्ट केले आहे की, संदर्भपत्र न देणे हे विद्यार्थ्याच्या वर्तन व संस्थेच्या धोरणांशी संबंधित आहे, जातीय पार्श्वभूमीशी काही संबंध नाही.
प्रेम बिऱ्हाडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून म्हटलं की, “महाविद्यालयाने मला संदर्भपत्र दिलं नाही, त्यामुळे माझी लंडनमधील नोकरी गेली. काही लोकांना आम्ही दलितांनी पुढे गेलेलं बघवत नसल्यामुळे माझे दस्तावेज दिले नाहीत.”
मात्र प्राचार्या निवेदिता एकबोटे यांनी पत्रात म्हटलं आहे की, “सदर विद्यार्थी महाविद्यालयातून २०२४ मध्ये पदवीधर झाला असून त्याला यापूर्वी तीन वेळा Letter of Recommendation (LOR) आणि एक बोनाफाइड प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. त्याच्या मागण्या संस्थेच्या धोरण आणि शिस्तीच्या निकषांवरून नाकारल्या गेल्या आहेत. त्याच्या जातीय पार्श्वभूमीशी याचा काहीही संबंध नाही.

त्यांनी असेही नमूद केले की, प्रेम बिऱ्हाडेला महाविद्यालय आणि अधिकाऱ्यांविरोधात सोशल मीडियावर खोटे, दिशाभूल करणारे आणि उत्तेजक व्हिडिओ प्रसारित करत आहे, जे सायबर छळ आणि डिजिटल माध्यमांतून बदनामीसारखे आहे. प्राचार्यांनी पोलिसांना विनंती केली आहे की, या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई करावी.
प्राचार्या निवेदिता एकबोटे यांनी स्पष्ट केले की, “महाविद्यालयात कधीही जातीवर आधारित भेदभाव झाला नाही. आमची संस्था समानता, सर्वसमावेशकता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर कार्यरत आहे. मी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते.”


