पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ येथे घडलेल्या 20 वर्षीय तरुणीच्या हत्येच्या भीषण प्रकरणाचा उलगडा उरुळी कांचन पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दहा दिवसांत केला आहे. शरीरसुखाची मागणी केल्यावर पीडित तरुणीने दिलेला ठाम नकार आणि केलेला विरोध हा नराधमाला न पचल्याने त्याने संतापाच्या भरात तिचा खून केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
दिनेश संजय पाटोळे (वय 26, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन) या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या दक्ष तपासामुळे पुन्हा एकदा कायद्याचा धाक गुन्हेगारांच्या मनात बसला आहे.
• घटनेचा तपशील
१४ ऑक्टोबरच्या सायंकाळी कोरेगाव मुळ येथील पुनम विनोद ठाकूर (वय २०, व्यवसाय – नोकरी) ही तरुणी आपल्या नेहमीच्या मार्गाने पायी घरी जात असताना, उरुळी कांचन-नायगाव रोडवरील प्रयागधाम हॉस्पिटलजवळ तिच्यावर निर्घृण हल्ला करण्यात आला. आरोपीने तिचा पाठलाग करून शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार देताच तिच्या तोंडावर दाब देऊन झुडपात ओढत नेले. पीडितेने आरडाओरड केल्यावर आरोपीने संतापाच्या भरात तीक्ष्ण दगडाने तिच्या डोक्यावर वार करत घटनास्थळीच तिचा खून केला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मयत तरुणीच्या भावाने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर तपासाला वेग आला.
• तपासाची दिशा आणि पोलिसांची चौकस कामगिरी
घटनास्थळाजवळील ६० ते ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. जवळपास २०० ते २५० व्यक्तींना चौकशीसाठी पोलिसांनी गाठले. फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसली, परंतु परतीच्या फुटेजमध्ये तो दिसला नाही.
ही माहिती नागरीक व गुप्त बातमीदारांना दाखविण्यात आली. त्यानंतर समजले की, फुटेजमधील व्यक्ती दिनेश संजय पाटोळेच आहे. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले असता त्याच्या हालचालींमध्ये संशयास्पद बदल दिसून आला. चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
• आरोपीची कबुली
चौकशीत आरोपीने सांगितले की, पुनम ठाकूर ही एकटी चालत असताना त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने विरोध केल्याने त्याने तिचा रागाने खून केला. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली असून न्यायालयाने आरोपीला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
• तपासातील पथकाचे कौतुक
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, हायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, ईश्वर जाधव तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, राजु मोमीण यांच्यासह तब्बल तीसहून अधिक अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रकरणाचा छडा लागला.


