
उमेश गायगवळे मुंबई
“जे जगी जगते तया, माझे म्हणा, करुणाकरा” या भावनेशी प्रामाणिक राहून गेली दहा वर्षे पर्यावरण, शाश्वत विकास, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि समाजजागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या नाम फाऊंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पुण्यात नुकताच उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष नाना पाटेकर आणि संस्थापक-सचिव मकरंद अनासपुरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत संस्थेने उभा केलेला कार्याचा भक्कम पाया, यापुढील कार्ययोजना आणि सामाजिक चळवळीचा निर्धार या कार्यक्रमात प्रतिध्वनित झाला.
समाजासाठी कलावंत
२०१५ साल… मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाने थैमान घातले होते. शेतजमिनी ओसाड पडल्या होत्या, पिकं जळून खाक झाली होती. सर्वात भीषण म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दररोज वाढत होते. गावोगाव विधवांची हुंदक्याने रडणारी मने, भुकेलेली पोरं, हातात पसरलेल्या कर्जाच्या पावत्या… हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं.
सरकारी योजना होत्या, परंतु त्या कागदोपत्रीच. आश्वासने होती, पण त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नव्हती. त्या वेळी दोन संवेदनशील कलाकारांनी, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी, ठरवलं की आता फक्त पाहायचं नाही, तर उभं राहायचं. नाम फाऊंडेशनचा जन्म झाला.
समाजासाठी कलावंतांची निष्ठा
या प्रवासात अभिनेता आमिर खानसह अनेक दात्यांनी संस्थेच्या कामात हातभार लावला. “जे सरकारला जमलं नाही, ते या दोन कलावंतांनी देशाला दाखवून दिलं”असे अनेक जण बोलून दाखवतात.
आमिर खानचे योगदान
अभिनेता आमिर खानने पाणी फाउंडेशनद्वारे जलसंधारण क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्याचे अनुभव आणि नेटवर्क ‘नाम फाऊंडेशन’च्या कार्याला पूरक ठरले. नानासोबत काम करताना त्याने “सामाजिक कार्य ही केवळ दानधर्माची गोष्ट नाही, तर ती विकासाची गुरुकिल्ली आहे,” हा संदेश दिला.
नाम फाऊंडेशन दशकपूर्ती सोहळ्याला
मान्यवरांची उपस्थिती आणि संदेश
या सोहळ्याला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, “नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मी येथे आलो आहे. समाजातील समस्यांचे रूपांतर संधींमध्ये करणे महत्त्वाचे आहे. चांगल्या कामासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते; त्यासाठी इच्छाशक्ती आणि लोकसहभाग असणे पुरेसे आहे. ‘नाम’चे काम हे देणारे हात होण्यापेक्षा मदत करणारे हात व्हावे याचा आदर्श आहे.”
चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी ‘वर्क मॉड्युल’च्या माध्यमातून रोजगारनिर्मितीची आवश्यकता अधोरेखित केली. “वेगवेगळे प्रयोग केवळ खाजगी पातळीवर न राहता शासनाच्या साखळीत सामील होणे गरजेचे आहे. त्यामुळे उपक्रमांचा विस्तार होईल आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळेल,” असे ते म्हणाले.
उदय सामंत यांनी शासन-समन्वयातून नाम संस्थेने केलेल्या कामाचे कौतुक केले. “अनेक शासकीय योजनांमध्ये ‘नाम’ला समाविष्ट करून प्रत्यक्ष काम घडताना पाहण्याचा मला अनुभव आहे,” असे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांचा प्रवास – एक आढावा
* शेतकऱ्यांची कर्जफेड आणि आत्महत्या रोखण्यासाठी थेट मदत
* पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिमा, विहिरी व पाणंद प्रकल्प
* ग्रामीण भागात रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण
* शाळा, आरोग्यसेवा आणि महिलांसाठी उपक्रम
* पर्यावरणपूरक शेती, वृक्षारोपण, जलसंवर्धन
* गाव पातळीवर शाश्वत विकासाचे नमुने उभारणे
आजवर हजारो शेतकऱ्यांचे कर्ज फेडले गेले, शेकडो गावांत जलसंधारण प्रकल्प पूर्ण झाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उद्योग व प्रशिक्षण प्रकल्प राबवले गेले.
पुढची दिशा – कोणत्या योजना आवश्यक?
या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त ‘नाम’चे संस्थापक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढील कार्ययोजनेवर प्रकाश टाकला.
* शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन विमा योजना
* शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाला स्थिर बाजारपेठ आणि हमीभाव
* ग्रामीण तरुणांसाठी स्टार्टअप व कौशल्य विकास केंद्रे
* महिलांसाठी स्वयंरोजगार प्रकल्प
* खापर्यावरणपूरक गाव विकासाचे मॉडेल राज्यभर राबवणे
“हा मानवतेचा यज्ञ आहे. या यज्ञाला प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार हातभार लावावा. आम्ही फक्त सुरुवात केली आहे, पुढचा प्रवास लोकांच्या सहकार्यानेच शक्य होईल,” असे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.
समाजपरिवर्तनाची नवी वाट
सरकार आणि समाज यांच्यात दुवा बनून नाम फाऊंडेशनने मागील दशकात शाश्वत विकासाचा आदर्श घालून दिला आहे. दुष्काळी संकट, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न यावर थेट काम करताना कलावंतांनी उभारलेली ही संस्था आज समाजपरिवर्तनाची नवी वाट दाखवत आहे. दशकपूर्तीच्या निमित्ताने ‘नाम’ची ही चळवळ अधिक प्रभावी योजनांच्या माध्यमातून पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
‘नाम फाऊंडेशन’ची कहाणी ही केवळ एका संस्थेची नाही, तर ती माणुसकीच्या आंदोलनाची आहे. कलाकारांनी आपल्या लोकप्रियतेचा उपयोग जर लोकहितासाठी केला, तर समाजात परिवर्तन घडवता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे नाम.
आजवर शेकडो शेतकरी कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या संस्थेची दशकपूर्ती ही माणुसकीच्या विजयाची कहाणी आहे. पुढील प्रवासात हे काम आणखी विस्तृत होईल.
कारण खरी चळवळ तीच जी जनतेला सामावून घेते आणि समाजात सकारात्मक बदल घडवते…
आणि म्हणूनच ..
“नाम फाऊंडेशन” हे फक्त नाव नाही, ती आहे एक जिवंत क्रांती, जी शेतकऱ्यांच्या डोळ्यातला विश्वास बनली आहे.