
विरार प्रतिनिधी
मुंबईजवळील विरार येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. दुर्घटनेला तीस तासांहून अधिक काळ उलटूनही ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अखंड सुरू आहेत. एनडीआरएफची पाचवी बटालियन, वसई-विरार महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता कार्यरत आहेत.
वाढदिवसाचा आनंद आणि मृत्यूची छाया
विरार (पूर्व) येथील विजय नगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंटमध्ये जॉयल कुटुंब आपल्या चिमुकली उत्कर्षाचा पहिला वाढदिवस साजरा करत होते. घर सजले होते, केक कापण्यात आला होता, कॅमेऱ्यात क्षण टिपले गेले. परंतु, आनंदाचे हे क्षण संपले अन् केक कापल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच इमारतीचा मागील भाग कोसळून शेजारच्या चाळीवर आदळला.
या दुर्घटनेत चिमुकली उत्कर्षा आणि तिची आई आरोही जॉयल यांचा मृत्यू झाला. वडील ओंकार जॉयल यांचा अद्यापही शोध सुरू आहे.
स्थानिकांचा धाडसी प्रयत्न
एनडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी धैर्य दाखवत ढिगाऱ्यातून सात जणांना जिवंत बाहेर काढले. यातील काहींना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर विरार व नालासोपारा येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
बेकायदेशीर बांधकामांचा बळी
वसई-विरार परिसरात बेकायदेशीर बांधकामांचे जाळे पसरले असून या निष्काळजीपणामुळे वारंवार दुर्घटना घडत आहेत. केवळ १५ दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामात काचेचा स्लॅब पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजी भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गुन्हा दाखल, पण अटक अद्याप नाही
या दुर्घटनेप्रकरणी विरार पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल गोपीनाथ साने आणि जमीन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम ५२, ५३, ५४ तसेच भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.