
नवी दिल्ली वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी (५ ऑगस्ट) दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. ११ मे रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सत्यपाल मलिक यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध राज्यांत राज्यपालपदाची धुरा सांभाळली. मात्र, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांमुळे ते विशेष चर्चेत राहिले. त्यांच्या कार्यकाळातच, ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले आणि जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणण्यात आला. त्याच दिवशी, म्हणजे ५ ऑगस्ट २०२५ रोजी, मलिक यांनी अंतिम श्वास घेतल्याची घटना, काळजाला भिडणारा योगायोग ठरली आहे.
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेश — जम्मू-काश्मीर आणि लडाख — असे विभाजन करण्यात आले. त्यानंतर मलिक यांची गोव्याचे १८ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी मेघालयाचे २१ वे राज्यपाल म्हणून ऑक्टोबर २०२२ पर्यंत कार्यभार सांभाळला.
सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसावडा गावात एका शेतकरी जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. १९६८-६९ मध्ये मेरठ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले, आणि तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.
मलिक यांनी आपल्या कार्यकाळात अनेकदा स्पष्टवक्तेपणा, प्रशासनातील पारदर्शकता आणि समाजहिताचे धोरण यावर भर दिला. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एक स्पष्ट, बिनधास्त आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
सरकारकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला असून अंत्यसंस्काराची माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.