
अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर : तालुका पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल ६० लाख ५० हजार रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा जप्त केल्या. तसेच दोन कोटींहून अधिक किमतीच्या नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे कोरे कागदही जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
अहिल्यानगरच्या आंबीलवाडी परिसरातील एका पानटपरी चालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अहिल्यानगर, बीड आणि संभाजीनगरमधून निखिल गांगर्डे, सोमनाथ शिंदे, प्रदीप कापरे, मंगेश शिरसाट, विनोद अरबट, आकाश बनसोडे आणि अनिल पवार यांना ताब्यात घेतले. अंबादास ससाने हा आरोपी अद्याप फरार आहे.
या टोळीने बनावट नोटा संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुप्त ठिकाणी तयार केल्याचे निष्पन्न झाले असून या ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या बनावट नोटा हुबेहूब मूळ ५०० रुपयांच्या नोटांप्रमाणेच दिसत असून त्या छोट्या व्यावसायिकांमार्फत चलनात आणल्या जात होत्या.
पोलिसांच्या तपासानुसार, या रॅकेटमध्ये वितरकांना ५० हजार रुपयांना एक लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा दिल्या जात होत्या. त्यामुळे बनावट नोटांचा साठा वाढत असून बाजारपेठेपासून बँकांपर्यंत याचा धोका पोहोचला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बँका व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद नोटांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.