
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-६ पथकाने कुर्ला (पश्चिम) येथील माकडवाला कंपाऊंडमधील दोन गोडावूनवर छापा टाकत सुमारे २५ लाखांचा प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवर्सचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत उबेद मोहम्मद सलीम शेख (वय ३१) या इसमाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १ ऑगस्ट रोजी कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, आशाबाई चाळ, सिद्दपूरा मस्जिद जवळील माकडवाला कंपाऊंडमध्ये शासनाने बंदी घातलेला ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने साठवून ठेवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तत्काळ छापा टाकून तपास केला असता, उबेद शेख याने ई-सिगारेट विक्रीसाठी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर साठा केल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि फ्लेवर्सचे एकूण १८८४ नग ई-सिगारेट, विविध प्रकारचे तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवर्स तसेच रोख रक्कम असा मिळून एकूण २५,५०,१९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५२५/२०२५ नोंदवून इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन, व्यापार, साठवणूक, वितरण आणि जाहिरात प्रतिबंध) अधिनियम २०१९, तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध व व्यापार विनियमन) अधिनियम २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कक्ष-६ करत आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण – १) विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोनि सुशांत सावंत, सपोनि मधुकर धुतराज, पोउनि संदिप रहाणे, मपोउपनि कल्पना माशेरे, तसेच स. फौ. देसाई, पारकर, पो. ह. तूपे, शिंदे, गायकवाड, भालेराव, शेख, माळवेकर, पो. शि. बोढारे, ससाने, सुतार, डाळे आणि बागूल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.