
मुंबई प्रतिनिधी
“लाईक्स आणि कमेंट्सच्या हव्यासाने विवेक हरवतो, आणि त्याची किंमत आयुष्यभर पुरेल इतकी महाग ठरते,” असं म्हणतात. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक भीषण व्हिडिओ याच गोष्टीचं प्रत्यंतर देतो. रेल्वे रुळांवर रील बनवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरतो आहे.
— Abyss of human stupidity (@KarmaCIip) October 4, 2025
थरकाप उडवणारी दुर्घटना
घटनेचं नेमकं ठिकाण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, व्हिडिओमध्ये काही युवक रेल्वे रुळांवर उभे राहून ट्रेनची वाट पाहताना दिसतात. हेतू स्पष्ट होता” धोकादायक रील बनवून ती व्हायरल करण्याचा.
मात्र, हा खेळ एका तरुणासाठी प्राणघातक ठरला. ट्रेन जवळ येताच इतर मुले बाजूला झाली, पण एकाने ट्रेनच्या अगदी जवळ उभं राहण्याची चूक केली. वेगाने येणाऱ्या ट्रेनला त्याचं डोकं इतक्या जोरात आपटलं की त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, धडकेनंतर त्याच्या कवटीचाही चुरा झाला.
क्षणिक हाव, कायमचा अंत
सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासात तरुणाई धोकादायक स्टंट्स करत असल्याचं चित्र सतत समोर येत आहे. रील्सच्या चढाओढीत क्षणभराची मस्ती किती महागात पडू शकते, हे या घटनेतून स्पष्ट होतं.
रेल्वे रुळांवर किंवा अशा धोकादायक ठिकाणी व्हिडिओ शूट करणं हे केवळ कायद्याने गुन्हा नाही, तर जीवघेणं आहे. काही सेकंदांच्या रीलसाठी आयुष्य गमावणं, ही अतिशय वेदनादायक शोकांतिका आहे.
पालक व प्रशासनाकडून जागरूकतेची मागणी
सध्या तरुणाई सोशल मीडियाच्या ‘फेम’च्या शर्यतीत आंधळी धावताना दिसते. पालकांनी मुलांकडे लक्ष देणं आणि प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक असल्याची मागणी होत आहे.
ही घटना केवळ अपघात नाही, तर समाजातील ‘डिजिटल व्यसनाच्या’ धोकादायक प्रवृत्तीचं प्रतिबिंब आहे. काही सेकंदांच्या लाईक्स-कमेंट्ससाठी जीव धोक्यात घालणं, हे विवेकशून्यतेचं टोक आहे.