
रामनगर प्रतिनिधी
नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिका अश्विनी पाटील (वय ५०) यांचा खून करून त्यांचा मृतदेह तिनईघाट येथील पुलाखाली टाकल्याप्रकरणी आरोपी शंकर पाटील (वय ३५, रा. नंदगड) याला रामनगर पोलिसांनी अटक केली.
रामनगर–गोवा महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचालकाच्या माहितीवरून हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाला रॉडने बांधून त्यावर दगड ठेवण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्राथमिक चौकशीत शंकर पाटील याने सोन्यासाठी खून केल्याची कबुली दिली. शिक्षिकेजवळील दागिने विकून मिळालेली रक्कम त्याने खासगी बँकेत ठेवली असल्याचे पोलिसांना सांगितले. संशयिताने मृत शिक्षिकेच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना दिशाभूल करणारे संदेश पाठवून ती आत्महत्या करत असल्याचे भासवले होते.
शिक्षिका व आरोपी यांच्यात मैत्री होती. ते दोघे यात्रेसाठी कक्केरीला गेले होते. मात्र खून केवळ सोन्यासाठी की इतर कुठल्या कारणासाठी झाला, याचा तपास सुरू आहे. खूनासाठी वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
मृतदेह टाकण्यासाठी ‘जोयडा तालुका’ सुरक्षित?
जोयडा तालुक्यात मृतदेह टाकण्याचे प्रकार वाढत असून यापूर्वीही खून करून येथे प्रेत फेकल्याच्या घटना घडल्या आहेत. कॅसलरॉक, गणेशगुडी, अनमोड घाट परिसरात अनेक मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोपींसाठी हा परिसर मृतदेह लपविण्याचे ‘सुरक्षित ठिकाण’ ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.