
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ई-कॉमर्स कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ₹४५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा, कक्ष-८ ने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी बोरीवली (पश्चिम) येथील चंदावरकर रोडवरील रिलायन्स डिजीटल स्टोअरसमोर सापळा रचण्यात आला. या वेळी एका टेम्पो आणि क्रेटा कारमधील चार संशयितांना ई-कॉमर्स पार्सलवरील बारकोड स्टीकर अदलाबदल करताना रंगेहात पकडण्यात आले.
पोलिस तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली. आरोपी ई-कॉमर्स साइटवरून दोन ऑर्डर्स देत” एक महागडी आणि दुसरी स्वस्त. डिलिव्हरी स्वतःकडे घेताना ते महागड्या वस्तूच्या बॉक्सवरील बारकोड स्वस्त वस्तूच्या बॉक्सवर व उलट चिकटवत. त्यानंतर स्वस्त वस्तू परत पाठवून, रिफंडच्या माध्यमातून लाखोंचा गंडा घालत असत.
या कारवाईत इलेक्ट्रॉनिक वस्तू, टाटा एस टेम्पो आणि क्रेटा कारसह ₹४५,०९,३३३ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींपैकी तीन हरयाणातील असून, एक छत्तीसगडचा आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९/२०२५ दाखल करण्यात आला असून, आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि रोहन बगाडे आणि त्यांच्या पथकाने केली.
ई-कॉमर्स फसवणुकीविरोधात मुंबई पोलिसांची ही कारवाई मोठा धक्का ठरत असून, ऑनलाईन व्यवहारांमधील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.