
बीड प्रतिनिधी
आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते त्याची सहा पटीने फेड देखील केली. मात्र राक्षसी वृत्तीच्या सावकारांना आणखीन पैसे हवे होते.
आणखीन पैसे दे अन्यथा तुला चटके देऊन मारू’, अशी धमकी या व्यापाऱ्याला देण्यात आली. सावकारांचा वाढता जाच सहन न झाल्याने व्यापाऱ्याने थेट पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच चिठ्ठी लिहिली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय कांकरिया असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील सावकारकी किती जुलमी ठरतेय हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
चंदन कांकरिया हे आपले काका संजय कांकरिया खासगी सावकारांच्या किती दहशतीत होते हे हतबल होऊन सांगताना दिसत आहेत. माळ चढवलेल्या फोटोत दिसणारे हे आहेत पाटोदा येथील व्यापारी संजय कांकरिया… तीन दिवसापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. संजय कांकरिया हे व्यापारी होते आर्थिक विवंचनेतून त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. कर्जाची सहा पट रक्कम फेड देखील केली. मात्र सावकारांची नजर त्यांच्या जमिनीवर होती. आणखीन पैसे हवेत असा तगादा सावकारांकडून लावण्यात आला.
‘पैसे दिले नाही तर चटके देऊन तुझ्यासह कुटुंबाला जिवंत मारू.’ अशी धमकी सावकारांनी दिली आणि ही धमकी संजय कांकरिया यांना सहन झाली नाही. वाढलेला जाच पाहून कांकरिया यांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनाच चिठ्ठी लिहून शेतातील पत्र्याच्या शेडच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय कांकरिया यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ त्याच्यासोबत असलेला अमृत भोसले आणि दीपक साळुंके या दोघांकडून संजय कांकरिया यांनी व्याजाने पैसे घेतले होते. कांकरिया यांनी या दोघांना सहा पट पैसे परत केले तरीही यांनी पैशाचा तगादा लावला. चटके देऊन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात अमृत भोसले, दीपक साळुंके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.