
पुणे प्रतिनिधी
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील राहत्या घरी झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली असून, सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत “हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत” मांडला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या सन्मानांनी गौरविले आहे. त्यांनी ‘आयुका’ या संस्थेची स्थापना केली आणि संचालक म्हणून कार्य केले. त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे जुलै २०२३ मध्ये पुण्यात निधन झाले. त्या कर्करोगाने त्रस्त होत्या.
१९६६ साली डॉ. जयंत नारळीकर यांचा विवाह गणितज्ज्ञ मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन कन्या आहेत. १९७२ साली ते परदेशातून पुन्हा भारतात परतले. मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) खगोलशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९८८ मध्ये त्यांची पुणे येथील ‘आयुका’ (आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र) संस्थेच्या संस्थापक संचालकपदी नियुक्ती झाली.
डॉ. मंगला नारळीकर यांनी विज्ञानप्रसारातही मोलाची भूमिका बजावली. त्या ‘नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका असून, ‘पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे पुस्तक त्यांनी स्वतंत्रपणे लिहिले आहे. डॉ. जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक ललित लेखन मराठीतील विविध नियतकालिकांतून सातत्याने प्रसिद्ध होत असते. त्यांच्या अनेक पुस्तकांचे जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतर झाले असून, त्यांनी विज्ञानाचे लोकाभिमुख रूप जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून, त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९६५ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण आणि २००४ मध्ये पद्मविभूषण या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवले. याशिवाय, डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिर्ला सन्मान, तसेच फ्रेंच अस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सन पुरस्कार हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांना प्राप्त झाले.