
मुंबई प्रतिनिधी
मुंबई |मालाड मढ बेट परिसरात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेल्या अनधिकृत बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिका कडक भूमिका घेत आहे. या कारवाईदरम्यान बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या अनधिकृत बंगल्यावरही पालिकेने लक्ष केंद्रीत केल्याने खळबळ उडाली आहे.
पालिकेने मढमधील एरंगल गावात असलेल्या एका भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बंगल्यासंदर्भात मिथुन यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये विचारण्यात आले आहे की, संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याने ते जमीनदोस्त का करू नये? त्यासाठी त्यांनी योग्य ते स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
स्पष्टीकरण न दिल्यास थेट कारवाई
मिथुन चक्रवर्ती यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही, तर पालिकेकडून त्यांच्या बंगल्यावर थेट तोडक कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच भविष्यात कायदेशीर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.
१०० हून अधिक अनधिकृत बांधकामांची यादी
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मढ परिसरात १०० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे आढळली आहेत. यातील बरीचशी बांधकामे बनावट लेआउट प्लॅनच्या आधारे उभारण्यात आली असून, या सर्व अतिक्रमणांवर मे महिन्याच्या अखेरीस कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे परिसरातील इतर भूखंडधारक आणि रहिवासी सतर्क झाले असून, अनेक लहान-मोठ्या झोपडपट्ट्यांवरही पालिकेचे लक्ष आहे. मोठ्या बंगल्यांसह इतर अनधिकृत बांधकामांचीही तपासणी सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.