
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | आग्रीपाडा परिसरात जमिनीच्या वादातून शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४१ जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना रविवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. अटकेतील २० महिला आणि २१ पुरुषांचा समावेश आहे.
शनिवारी रात्री मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जागेवर झालेल्या वादातून कंपनीचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांवर मोठा हल्ला झाला होता. जमावाने लाठ्याकाठ्यांपासून रायफलपर्यंत विविध हत्यारांचा वापर करत कर्मचाऱ्यांवर आणि रक्षकांवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कंपनीचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी कारवाई करत फ्रॅंको इंडिया फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित ४१ जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चार रायफली, मिरची स्प्रे आणि अन्य हल्लेखोर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांकडून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सध्या संबंधित जमीन प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून कोर्टाने “जैसे थे” आदेश दिले आहेत. उद्या अटकेतील आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणामुळे आग्रीपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.