
मुंबई प्रतिनिधी
मुंबई| दहिसर परिसरातील गणपत पाटील नगर येथील गल्ली क्रमांक १४ मध्ये रविवारी सायंकाळी उशिरा दोन कुटुंबांत तुफान हाणामारी होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
शेख आणि गुप्ता कुटुंबांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून दुश्मनी सुरू होती. या जुन्या वैमनस्यातूनच रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राम नवल गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉलसमोर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद उफाळून आला. दारूच्या नशेत असलेल्या अमित शेख याने राम नवल गुप्ताशी वाद घालून वादाला सुरुवात केली. या वादानंतर दोघांनी आपापल्या कुटुंबातील सदस्यांना बोलवले आणि पाहता पाहता गल्लीतील वातावरण चिघळले.
हमीद शेख व त्याचा मुलगा अरमान, हसन आणि राम नवल गुप्ता याचा मुलगा अमर, अरविंद व अमित यांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या तुफान हाणामारीत राम नवल गुप्ता व अरविंद गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर हमीद शेख यानेही प्राण गमावले. अमर व अमित गुप्ता तसेच अरमान व हसन शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एमएचबी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांवर परस्परविरोधी खुनाचे गुन्हे दाखल केले असून जखमी आरोपींवर पोलिस निगराणी ठेवून उपचार सुरू आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.